Shiv Sena’s Jan Akrosh agitation in Buldhana : उद्धवसेनेचे बुलढाण्यात जनआक्रोश आंदोलन, सत्ताधाऱ्यांवर हल्ला
Buldhana महायुती सरकारमधील कथित भ्रष्टाचार व कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी उद्धवसेनेतर्फे सोमवारी बुलढाण्यात ‘जनआक्रोश आंदोलन’ छेडण्यात आले. जिजामाता प्रेक्षागृह मैदानावर झालेल्या या धरणे आंदोलनात प्रतीकात्मक जिवंत देखाव्यांनी सत्ताधाऱ्यांच्या वादग्रस्त कारनाम्यांचे चित्रण करून वातावरण पेटवले.
प्रदर्शनात रमी खेळणारा कृषीमंत्री, डान्सबार प्रकरणातील गृहराज्यमंत्री, अघोरी पूजेत सहभागी मंत्री, पैशांच्या बॅगांशी जोडलेले मंत्री व सामान्यांवर हात उगारणारे लोकप्रतिनिधी यांचे कलात्मक सादरीकरण करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली. कलापथकांनी “दोन दिवसाची दुनिया पाहू द्या… आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या” यांसारखी गाणी सादर करत शेतकऱ्यांच्या वेदना मांडल्या. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
Vidarbha Farmers : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
आमदार सिद्धार्थ खरात यांनी भाषणात सरकारवर थेट हल्ला चढवला. “खोट्या आश्वासनांनी सत्ता मिळवूनही विकासकामाऐवजी मंत्र्यांनी राज्याच्या परंपरेला कलंक लावणारे कृत्य केले. कृषीमंत्री रमी खेळतात आणि शासन भिकारी असल्याचे वक्तव्य करतात. इतर मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. हा लढा फक्त सुरुवात आहे; शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि शेतकरीविरोधी धोरणे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असे ते म्हणाले.
जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनीही महायुतीवर जोरदार टीका केली. “उद्धव ठाकरे यांनी न मागता दोन लाखांची कर्जमाफी दिली. परंतु महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने विसरली. पीकविमा, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत, आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेल्यांना पाठीशी घातले जात आहे. सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री हतबल झाले आहेत,” असे ते म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, ‘लाडकी बहीण’चे अनुदान २१०० रुपये करण्याचा विचार
पक्ष प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके, महिला जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, गजानन वाघ, वसंतराव भोजने, नंदू कऱ्हाडे, संदीप शेळके यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. तीन तास चाललेल्या आंदोलनात विजया खडसन, सुनील घाटे, लखन गाडेकर, आशिष रहाटे, बद्रि बोडखे, विलास सुरडकर आदी सहभागी झाले.








