Shiv Sena ready to fight local election on it’s own : उद्धव गटाचा स्वबळाचा नारा; शहरातील समस्यांसाठी करणार आंदोलन
Nagpur फुट पडल्यानंतर शिवसेना प्रथमच नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामुळे पूर्वी भाजपसोबत ठरलेल्या जागावाटपाच्या नियमाची आठवण आता एकनाथ शिंदेंची शिवसेना करून देणारच आहे. मात्र त्याचवेळी उद्धव गटापुढे मोठे आव्हान आहे. कारण महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या समीकरणांमध्ये शिवसेनेचा नव्याने प्रवेश झाला आहे. अशात जागावाटपात सन्मान झाला नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कंबर कसली आहे. पण आघाडीच्या संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र येत लढावी, मात्र, जागा वाटपात काँग्रेसकडून सन्मानजनक स्थान मिळत नसेल तर स्वबळावरही लढण्यास आम्ही सज्ज आहोत, असा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे.
अनेक जुने पदाधिकारी हवे तसे काम करत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे निवडणूकीच्या अगोदर नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देण्यावर पक्षाचा भर राहणार आहे. नागपुरात सातत्याने स्थानिक नेतृत्वबदल होत असल्याने शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू असते. या पार्श्वभूमीवर मनपा निवडणूकीत ताज्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षनेतृत्वाने संकेत दिले आहेत.
रविभवन येथे राज्य संघटक सागर डबरासे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची संघटन आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, शहर प्रमुख नितीन तिवारी, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रीतम कापसे, वाहतूक सेनाप्रमुख राजेश वाघमारे, उपजिल्हाप्रमुख मनोज शाहू, अफसर सिद्दीकी, आशिष हाडगे, राम कुकडे, अब्बास अली, मुन्ना तिवारी आदी उपस्थित होते.
लोकांची मते हवी असतील तर त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. त्यामुळे त्या काळात जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक होऊन प्रशासनाविरोधात आंदोलने करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. ओ.सी.डब्ल्यू., महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध जनसमस्या विरोधात पक्षातर्फे मोर्चे काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर दीर्घकाळ चालले असते तर इतिहास वेगळा असता
काही लोक फक्त पदासाठी व सोशल मीडियावर फोटो टाकण्यापुरतेच मर्यादित आहेत. येत्या काळात जे आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष सक्रिय दिसणार नाहीत त्यांच्या जागी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.