Uddhav Thackerays friendly advice to Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना मित्रत्वाचा सल्ला
Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील मंत्र्यांच्या वादाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक मित्रत्वाचा सल्ला देत, राज्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत आशा व्यक्त केली आणि समाजातील भेदाभेद नष्ट करण्याचे आवाहन केले आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या महा मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तसेच देशातील अनेकविध प्रश्नावर भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सल्ला देताना टोलाही लगावला आहे. त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख कधीकाळचे राजकीय मित्र. असा उल्लेख केला. फडणवीस यांच्याशी अलिकडे तुमची चर्चा झालीय का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सांगितले की, आता तरी चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री. तुमच्याकडून चांगलं व्हावं ही अपेक्षा आजही आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी , लफडी आणि कुलंगडी बाहेर येत आहेत, त्या त्यांनी मोडीत काढल्या पाहिजे. हे मी त्यांना सांगतो. हे माझं मत… हा टोमणा नाही… हा सल्ला आहे. त्यांनी मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढल्या पाहिजे. नीती वगैरे या गोष्टी पाळत असतील तर हे जे काही चाललं आहे. त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं काम आहे.
Mahayuti Government : अजित पवार गटाचा भाजपला धक्का, मोठा नेता राष्ट्रवादीत!
काल बॅग दिसली, जमीन दिली जाते, 3 हजार कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सर्व चालले आहे. पण राज्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम फडणवीस होत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली हा भ्रष्टाचार सुरू आहे. दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या भविष्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याला नक्कीच भविष्य आहे. खचून कसं चालेल? लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, तसा तो परत जागा झाला पाहिजे. इथले सर्व उद्योग गुजरातला नेले, मराठी माणूस बाहेर काढला जातो, आता नाही जाग आली तर आपले डोळे कधीच उघडले जाणार नाही. जागे व्हा आणि जागे राहा. कुणावर अन्याय करू नका. पण कुणी अन्याय केला तर सहन करू नका. भेदाभेद गाडून एकत्र या, असं आवाहन त्यांनी केलं.
मराठा समाजाला भडकवलं जातं. भाजपची एक नीती आहे, राज्यातील सर्वात मोठ्या समाजाला भडकवायचं. तो पेटला तर त्या समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाज आहेत, त्यांना चिथवायचं. जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं. पटेलांना भडकवलं आणि पटेलांच्या व्यतिरिक्त इतरांना चिथवून एकत्र आणून सत्ता घेतली.हरियाणात जाट समाजाला भडकवलं. भाजप सत्तेतून गेलीच असं चित्र हरयाणात होतं. जाट तिरीमिरीने उभा राहिला आणि इतरांना जाटांची भीती दाखवून, एकवटून भाजपने सत्ता आणली. महाराष्ट्रात ‘ बटेंगे तो कटेंगे’ केलं. आपल्याला वाटलं हिंदू-मुस्लिम. पण त्यांनी मराठा आणि मराठेत्तर केलं. त्यांच्या विरोधात ओबीसी उभा केला. सत्ता आणली. मराठी भावंडांमध्येच समाजाच्या भिंती उभ्या करून पोळी भाजायची हे राजकारण हाणून पाडा, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या मते, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि गिरणी कामगारांच्या पुनर्वसनात मराठी माणसाला दुर्लक्ष केले जात आहे आणि विशिष्ट उद्योजकांना फायदा होत आहे. त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मूळ मराठी रहिवाशांना विस्थापित करण्याचा कट असल्याचा आरोप केला. जंगलतोड करून किंवा इतर मार्गांनी जमिनी बड्या उद्योजकांना दिल्या जात आहेत. जंगलतोड व्हावी. त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड आला तर तुम्ही तुरुंगात जाल. कारण जन सुरक्षा धोक्यात आणली आहे. मुंबईकरांनी एकवटून विरोध केला पाहिजे. तुमच्या घरातील वीज, गाड्या तोच देणार म्हणजे तुम्ही गुलाम होणार. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात आहे. धारावीत गिरणी कामगारांना घरे का देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जागा ही धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली आहे. त्याची गरज नाही. ती गिरणी कामगारांना का देत नाही? गिरण्याच्या जमिनीचा वापर फक्त गिरण्यासाठीच होता. पण चेंज ऑफ यूजर्स केलं. पण गिरणी कामगारांना घर दिलं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धारावीसाठी भूखंड घशात फुकट घातले. आमच्या गिरणी कामगारांना द्याना फुकट. गिरणी कामगार तुमचे कुणीच लागत नाही. त्यांच्यासाठी काहीच नाही. ज्यांनी मुंबई मिळवून दिली त्यांना काही देत नाही. देवनारचं डंपिंग ग्राऊंडही अदानीला दिल. डंपिंगचा कचरा साफ करणारी कंपनीही अदानीचीच आहे. हा देश अदानी चालवताहेत की अडाणी चालवताहेत. शिवसेना मुंबईसाठी कुठेही तडजोड करत नव्हती. ती तोडायचा, चोरण्याचा आणि संपण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला. धारावीचा पुनर्विकास मीही करत होतो. धारावीत प्रत्येक घरात एक उद्योग आहे. उद्योगासह त्यांना राहतं घर तिकडेच द्या. आता तिकडे सर्व्हे सुरू आहे. त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 80 टक्के लोकांना अपात्र ठरवलं. म्हणजे धारावीत फार कमी लोक राहतात. अशी माहिती त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर दिली.