unseasonal-rain-hailstorm-maharashtra-crop-loss-farmers-demand-compensation-2026 : जालना, जळगाव, नांदेड, बीड, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा तडाखा
Mumbai: महाराष्ट्रात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान घातले असून जालना, जळगाव, परभणी, धुळे, पुणे, नांदेड, बीड, सोलापूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष, गहू, कांदा तसेच इतर पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सोमठाणा परिसरात द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेले द्राक्षाचे घड वादळी वाऱ्यामुळे खाली पडले असून फळबाग उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. भोकरदन परिसरातही वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाल्याची घटना घडली असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद भागात काढणीसाठी तयार असलेले गव्हाचे पीक पावसामुळे पूर्णपणे भिजून गेले आहे. त्यामुळे उभे पीक जमिनीवर आडवे झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री आणि ग्रामीण भागात गारपिटीसह पाऊस झाल्याने गहू, कांदा, बाजरी आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीच्या नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील चाकण येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला कांदा अचानक पडलेल्या पावसामुळे भिजून खराब झाला आहे. बाजार समितीकडे योग्य शेड किंवा ताडपत्रीची व्यवस्था नसल्याने हजारो क्विंटल मालाचे नुकसान झाले असून आधीच कमी दरामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.
मराठवाड्यातील नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांतही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. नांदेडमध्ये ज्वारी, मका, केळी, आंबा, हळद आणि भाजीपाला पिके भुईसपाट झाली आहेत. अर्धापूर, मुदखेड आणि भोकर तालुक्यांत मोठे नुकसान झाले असून वीज पडून पशुहानीच्या घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्यातही वीज कोसळून बैल दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत, तर परभणीत ज्वारी, हळद, आंबा आणि चिकू बागांचे नुकसान झाले आहे.
Ncp constitution : राष्ट्रवादीच्या नव्या घटनेतून ओबीसी, अल्पसंख्याक आणि सामाजिक सेल वगळले?
बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वीच हजारो हेक्टरवर नुकसान झाले असताना पुन्हा झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा आणि कांदा पिके आडवी झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला असून काही ठिकाणी डीपीला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
एकूणच राज्यभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली असून उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मेहनतीने उभे केलेले पीक निसर्गाच्या तडाख्यात गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त भागांतील शेतकरी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची आर्त मागणी करत आहेत.








