Upendra Shende did not compromise his principles even in crisis : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला माजी आमदारांच्या आठवणींना उजाळा
Nagpur माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी आपले आयुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसाठी समर्पित केले. उत्तर नागपूरचे आमदार असताना त्यांनी येथील जनतेची सेवा केली. गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्यावर व्यक्तिगत संकटे आली, पण त्यातही त्यांनी आपल्या विचारांशी तडजोड केली नाही, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या.
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या श्रद्धांजली सभेमध्ये गडकरी यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर अध्यक्षस्थानी होते. तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, रिपब्लिकन पक्षावर उपेंद्र शेंडे त्यांची पूर्ण निष्ठा होती. त्यांनी उत्तर नागपुरात प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. या संपूर्ण काळात आमदार असताना त्यांनी आपल्या परिस्थितीचा विचार कधीही केला नाही. त्यांनी अखेरपर्यंत तत्वांशी तडजोड केली नाही. गरिबीतही आपला प्रवास सुरू ठेवला. याचा मी स्वतः साक्षीदार आहे, असेही गडकरी म्हणाले.
विद्यार्थी परिषदेत सक्रीय असतानापासून माझे उपेंद्र शेंडे यांच्यासोबत जिव्हाळ्याचे आणि व्यक्तिगत संबंध होते. ते आमदार म्हणून निवडून आले तेव्हा मी विधीमंडळात होतो. बरेचदा आम्ही मित्र जेवायला जायचो. विरेंद्र देशमुख, दिवाकर जोशी, अशोक धवड, उपेंद्र शेंडे आणि मी असे आम्ही सगळे एकत्र पिठलं भात, भाकरी खायला जायचो, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली.