Breaking

Vanchit Bahujan Aghadi : बोगस प्रवेश घालून शासकीय अनुदान लाटले; आश्रमशाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार

Government grants were embezzled by fake admissions : तीन दिवसांत कारवाई न झाल्यास ‘हिसका’ दाखवण्याचा वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा

Akola जिल्ह्यातील सुमनताई नाईक आश्रम शाळा, जांबवसू (ता. बार्शीटाकळी) येथे विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखवून शासनाकडून मिळणारे अनुदान लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, लिपिक, संस्थेचे अध्यक्ष, सचिव, एजंट तसेच इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

या संदर्भात सचिन डोंगरे, सूर्यकिरण अरखराव आणि श्रीकृष्ण बनसोड या पालकांनी सहाय्यक आयुक्त, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग, अकोला यांच्याकडे लिखित तक्रार सादर केली. त्यांच्या मुलांनी मदर टेरेसा स्कूल, अकोला येथे नर्सरीपासून शिक्षण घेतले असून यावर्षी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला आहे. मात्र, यू-डायस पोर्टलवर त्या विद्यार्थ्यांचे नाव आधीच सुमनताई नाईक आश्रम शाळेत पहिल्या वर्गात दाखल असल्याचे दिसून आले.

Pranjal Khewalkar’s : प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमधून उघड झाला ‘ नंगानाच ’ !

ही बाब लक्षात येताच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक गजानन मनवर यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता, “पटसंख्या वाढवण्यासाठी आधारकार्डाच्या झेरॉक्सवर आधार घेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता, आता ते रद्द केले आहे,” असे धक्कादायक उत्तर मिळाले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारकर्त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे पालकांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बोगस प्रवेश करून शासकीय अनुदान उचलण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या नावाने शासनाकडून दरमहा सुमारे २२०० रुपये, म्हणजे वर्षाला सुमारे २२ हजार रुपये प्रती विद्यार्थी अशा स्वरूपात अनुदान मिळते. त्यामुळे हे प्रकरण फक्त तांत्रिक त्रुटी नसून संगनमताने रचलेला आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप पालकांनी केला.

फक्त एका शाळेत नव्हे, तर अकोला जिल्ह्यातील इतर अनेक आश्रमशाळांमध्येही अशाच प्रकारचे बोगस प्रवेश झाले असण्याची शक्यता असल्याचे पालकांनी सांगितले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे यू-डायस डेटाबेसद्वारे पुनरावलोकन करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Dharmapal Meshram : आदिवासी फासेपारधींच्या वस्त्यांमध्ये दाखले वाटप करण्यासाठी शिबीरे घ्या !

या प्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांनी सरकारला तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला. “जर या प्रकरणात तीन दिवसांत चौकशी करून गुन्हे दाखल झाले नाहीत, तर वंचित बहुजन युवा आघाडी आपल्याच पद्धतीने बहुजन कल्याण विभागाला हिसका दाखवेल,” असा जाहिर इशारा पातोडे यांनी दिला.

या वेळी सचिन डोंगरे, सूर्यकिरण अरखराव, श्रीकृष्ण बनसोड, त्यांची मुले श्रावस्ती डोंगरे, विराज अरखराव, श्रेयश बनसोड, तसेच राजकुमार दामोदर, वैभव खडसे, सचिन शिराळे, सूरज दामोदर, नागेश उमाळे, आकाश जंजाळ, आकाश गवई, आशिष सोनोने, अमोल शिरसाठ, राजेश बोदडे, सम्राट तायडे, सागर इंगळे, सुभाष अवचार यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.