Akola-vba-protest-social-justice-flex : अकोल्यात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, दोन दिवसांत बॅनर बदलण्याचा इशारा
Akola सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर विविध योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अकोल्यातील जुन्या आणि नवीन बसस्थानक परिसरात बॅनर लावण्यात आले होते. मात्र, या बॅनरवर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे फोटो झळकवत असताना, ज्या महापुरुषांच्या नावाने या योजना राबवल्या जातात, त्यांचेच फोटो वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन युवा आघाडीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वाखाली हे बॅनर फाडून त्यांचे दहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार करताना महापुरुषांचे फोटो जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
Panvel Municipal Corporation : पनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नितीन पाटील
पुरोगामी महाराष्ट्रात स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा हा दुरुपयोग असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे. प्रशासनाने येत्या दोन दिवसांत राज्यभरातील असे सर्व फ्लेक्स काढून त्यावर महापुरुषांचे फोटो सन्मानाने लावावेत, अन्यथा राज्यातील युवा आघाडीचे पदाधिकारी सर्व बॅनर काढून घेतील आणि संबंधितांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, संतोष वनवे, पातूर तालुका अध्यक्ष सम्राट तायडे, अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, सचिन शिराळे, शहर प्रसिद्धी प्रमुख नागेश उमाळे, आकाश जंजाळ, युवराज डोंगरे, विक्की कांबळे यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.








