Vanchit Bahujan Aghadi protests against gas shortage : गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन
Akola गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई थांबवून काळाबाजार रोखण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी चूल पेटवून त्यावर भाकरी थापत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
गॅस सिलिंडरच्या कृत्रिम टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत, ही टंचाई तातडीने थांबविण्यात यावी, काळाबाजारावर नियंत्रण आणावे, तसेच २५ दिवसांनंतरच सिलिंडर मिळण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली.
वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाने कम्युनिटी किचन सुरू करावे, प्रत्येक दोन किलोमीटर परिसरात भोजन व्यवस्था उभी करून गरजूंना अन्न उपलब्ध करून द्यावे, तसेच केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या नागरिकांनाही गॅस सिलिंडर देण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना सिलिंडर वितरित करण्यात आले, याचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासह ज्ञानेश्वर सुलताने, गजानन गवई, धीरज इंगळे, राजकुमार दामोदर, किशोर जामनिक, पवन बुटे, मंगला शिरसाट, संगीता अढाऊ, नगरसेवक पराग गवई, आकाश शिरसाट, प्रभा शिरसाट, मनोहर बनसोड, संतोष इंगळे, मंदा शिरसाट, कृतिका इंगळे, नगरसेवक नीलेश देव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








