Breaking

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक!

Congress aggressive for farmers’ loan waiver : महायुती सरकारवर टीका, आश्वासनांना विसरल्याचा आरोप

Akola निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सरकार अपयशी ठरत आहे. असा आरोप करत काँग्रेसने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून शेतकऱ्यांसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत लाभदायक दर मिळावा यासाठी काँग्रेसने सरकारवर दबाव टाकण्याची भूमिका घेतली आहे. निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि पिकांसाठी योग्य आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यांसारख्या पिकांची शासनाने थेट खरेदी करावी. भावांतर योजना जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. शेतीसाठी आवश्यक खते, बी-बियाणे, कीटकनाशके आणि अवजारांवरील GST हटवावा. निर्यातबंदी आणि अनियंत्रित आयातीमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी ठोस धोरण आखावे, अशा मागण्या काँग्रेसने केला आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली असून, बळीराजा अडचणीत आहे. सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत, तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी महापौर मदन भरगड, विजय कौसल, निखिलेश दिवेकर, विजय देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.