Demands grain procurement via NAFED : २ जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा
Motala शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने मका व सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश दिले असतानाही मोताळा तालुक्यात अद्याप नाफेडमार्फत खरेदी सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, २ जानेवारीपर्यंत नाफेड खरेदी केंद्र सुरू न झाल्यास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात तहसील प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने स्पष्ट आदेश देऊनही तालुक्यात नाफेडमार्फत मका व सोयाबीन खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा कोणताही लाभ मिळत नाही. बाजारभाव घसरले असताना नाफेड खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
संघटनेच्या वतीने असा इशारा देण्यात आला आहे की, १ जानेवारी २०२६ पर्यंत नाफेडमार्फत धान्य खरेदी सुरू न झाल्यास २ जानेवारी रोजी तहसीलदारांच्या दालनात सोयाबीन व मका फेकून ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
Lonar Lake : लोणार सरोवराच्या क्षारतेत घट; जैवविविधतेपुढे नवे आव्हान!
या निवेदनावर महेंद्र जाधव, भागवत धोरण, सै. इमरान, गजानन भोपळे, मारोती मेंढे, सै. वसीम, निना घाटे, सागर पुरभे, बंडू देशमुख, निखिल पाटील, गणेश राठोड, राजू शिंदे, प्रविण पाटील, नीलेश क्षिरसागर, गजानन गवळी, मुकुंदा शिंबरे, गणेश चव्हाण, सुनील गोरे, हिदायत खान, विलास जोहरी, सलीम शाह, अमर उगले, योगेश तायडे, एकनाथ मगरे व अमजद खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नाफेड खरेदी तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.








