Farmer identity number is compulsory : शेतकऱ्यांच्या लाभासाठी डिजीटल सेवा आणि डेटा व्यवस्थापन
Amravati जिल्ह्यात केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या लाभांसाठी डिजीटल सेवा आणि डेटा व्यवस्थापनाचा उपयोग केला जाणार आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आणि त्यांच्या थेट सहभागासाठी शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) आवश्यक करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना नागरी सुविधा केंद्र (CSC) मार्फत आपला शेतकरी ओळख क्रमांक त्वरित काढण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा, आठ अ, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक सोबत आणणे गरजेचे आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल, जो नोंदवल्यानंतरच शेतकरी ओळख क्रमांक तयार होईल.
Zilla Parishad school : मानधन मिळेपर्यंत शिक्षक रजेवर, विद्यार्थी वाऱ्यावर !
शेतकरी ओळख क्रमांक शेतकऱ्यांसाठी भविष्यकालीन योजनांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि योजनांसाठी अर्ज करताना हा क्रमांक आवश्यक राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा क्रमांक व्यवस्थित जतन करावा, असे प्रशासनाने सुचवले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. ॲग्रीस्टॅक योजनेद्वारे डेटा व्यवस्थापनाच्या आधारे योग्य आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना वेगाने पोहोचवता येणार आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ जलद गतीने मिळेल आणि कृषि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.
शेतकऱ्यांनी प्राधान्याने आपला शेतकरी ओळख क्रमांक काढावा. नोंदणी प्रक्रियेत अडचणी आल्यास गावातील तलाठी किंवा संबंधित नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. शासनाच्या या पुढाकारामुळे योजनांचा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन योजनेमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी प्रक्रियेचा भाग होणे आवश्यक आहे.