farmers may face Fertilizer shortage, middle east war impact : शेतकरी चिंताग्रस्त, खतांच्या किमती वाढणार; खरीप हंगाम धोक्यात?
Khamgao मध्य-पूर्व आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही उमटू लागला असून, युरिया आणि डीएपी खतांच्या संभाव्य टंचाईची भीती व्यक्त होत आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.
दरवर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सुमारे १ लाख ७५ हजार मेट्रिक टन खताची मागणी असते. मात्र यंदा प्रत्यक्षात किती साठा उपलब्ध होईल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. २०२५ साली सुमारे १.८५ लाख टन आवंटन मंजूर झाले असले, तरी १.७१ लाख टन मागणीच्या तुलनेत पुरवठा वेळेत आणि पुरेसा होईल का, हा मोठा प्रश्न आहे.
Eknath Shinde Shivsena : दिल्ली बैठकीनंतर जिल्ह्यात खळबळ; गटबाजी, नाराजी आणि सूचक हालचाली
भारत मोठ्या प्रमाणावर युरिया, डीएपी आणि पोटॅश खतांसाठी आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः रशिया आणि बेलारूस हे प्रमुख निर्यातदार देश असल्याने त्या भागातील तणावामुळे पुरवठ्यावर थेट परिणाम झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे मालवाहतूक मार्ग बदलले असून, जहाजांच्या विलंबामुळे खतांचा साठा वेळेत पोहोचत नाही. परिणामी, वाहतूक खर्चातही वाढ होत आहे.
जागतिक बाजारात खतांच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत. खरीप हंगामात खतांची मागणी शिखरावर असते. अशा वेळी पुरवठ्यातील अडथळे आणि वाढत्या किमती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
सध्या बाजारात खतांची मागणी तुलनेने कमी असली, तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून शेतकरी साठा करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे पुढील महिनाभरात मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत गरजेचे आहे.
Buldhana Politics : ‘३५ कोटी’वरून बुलढाण्यात राजकारण पेटले; गायकवाड-सपकाळ आमनेसामने
तज्ज्ञांच्या मते, जागतिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत सरकारने वेळेत पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनीही खतांचा वापर नियोजनबद्ध आणि काटकसरीने करण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा, खत टंचाईमुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती नाकारता येत नाही.








