Vidarbha Farmers : कर्जमुक्तीसाठी बाळापूरमध्ये शेतकरी पुत्रांचा एल्गार

 

Farmers’ sons rally in Balapur for loan wavier : सरकारचे प्रतिनिधी मूग गिळून गप्प; आंदोलकांचा आरोप

Akola “शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने जाहीर करा आणि शेतमाल हमीभाव कायदा लागू करा,” या प्रमुख मागण्यांसह शेतकरी पुत्र, जागर मंचतर्फे बाळापूर येथे एल्गार पुकारण्यात आला. तहसील कार्यालयावर धडक देत शेकडो युवा शेतकऱ्यांनी निदर्शने केली आणि तहसीलदारांना निवेदन सादर केले.

यंदाच्या खरीप हंगामात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टी झाली. त्यानंतरच्या रब्बी हंगामातही अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्र, जागर मंचतर्फे आंदोलन उभारण्यात आले. या आंदोलनात अक्षय राऊत, समन्वयक प्रशांत गावंडे, संजय भांबेरे, संजय शेळके, शिवाजीराव म्हैसने, अक्षय सपकाळ, अजय कवडे, प्रशांत गायकवाड, पवन गाडे यांच्यासह अनेक युवकांनी सहभाग घेतला.

“शेतीच्या प्रश्नावर सरकारचे प्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वास्तवात शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आले आहे. त्यामुळे सरकार नाकर्तेपणाची कमाल करत आहे,” असा संतप्त आरोप आंदोलकांनी केला.

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांनी नांगर सोडून मशाली हाती घेतल्या तर ?

सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढेल आणि त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा युवा शेतकऱ्यांनी दिला.

प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांची तातडीने संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी.

शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा.

सोयाबीनला क्विंटलमागे ६ हजार, हरभर्‍याला ८ हजार, कापसाला १० हजार, तर तुरीला १२ हजार रुपये हमीभाव द्यावा.

हमीभाव ठरवताना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.

शेतमालाच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा.

Vidarbha Farmers : निव्वळ घोषणा; कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी!

शेतीसाठी लागणारे खते, बियाणे, औजारे यांना जीएसटीमुक्त करावे.

पीककर्जाची परतफेड कालमर्यादा १२ महिन्यांची करण्यात यावी.

शेतकऱ्यांना प्रति हंगाम प्रति एकर ४० हजार रुपये किमान पीककर्ज उपलब्ध करावे.