Farmers’ Union Demands Complete Loan Waiver : बुलढाण्यातील शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांना मागणी
Chikhli राज्यातील अतिवृष्टी, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील दरघसरण यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने जाहीर करण्याचे निवेदन देण्यात आले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास किसनराव कणखर यांच्या नेतृत्वाखाली चिखली तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्फत हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची सविस्तर माहिती देत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने जाहीर करावी,शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा या पिकांची शासकीय खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करावी,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी,पिकांचे पंचनामे तत्काळ करून नुकसानभरपाईचे वितरण त्वरीत करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
संघटनेने स्पष्ट केले की, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून शासनाने सकारात्मक भूमिका घेत निर्णय न घेतल्यास संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल. “आस्मानी संकटाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दुर्लक्ष करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरून न्याय मिळवावा लागेल,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीपूर्वीच सादर झालेले हे निवेदन राज्यातील कृषी प्रश्नांना नव्या राजकीय उष्णतेची दिशा देणारे ठरले आहे.








