One-day fast of farmers children’s : शेतकरी सहवेदना दिवसानिमित्त एक दिवसाचा उपवास
Buldhana शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिखली येथे शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरी सहवेदना दिवसानिमित्त एक दिवसाचा उपवास करून आंदोलन केले.
राज्यभर १९ मार्च रोजी शेतकरी सहवेदना दिवस पाळण्यात येतो. यानिमित्त चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पक्षविरहित व सामाजिक स्वरूपाचे होते, त्यामुळे सर्वच पक्षातील शेतकरी पुत्रांनी यात सहभाग घेतला.
या प्रसंगी उपस्थितांनी शेतकऱ्यांच्या व्यथांवर आपले विचार मांडले आणि शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला. भविष्यात यासाठी अधिक ठोस पावले उचलण्यासाठी एक विशेष बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी झाला. यावेळी शिवणी आरमाळ येथील राज्य पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह पवनार आश्रमात आत्महत्या केली होती. ही घटना राज्यात पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या म्हणून नोंदवली गेली. ३९ वर्षांनंतरही आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे, ही चिंताजनक बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
Advantage Vidarbha 2025 : E-Marketplace राबवणार डिजीटल साक्षरता
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. फक्त एक दिवस उपवास करून प्रश्न सुटणार नाही, तर राजकीय पक्ष आणि संघटना यांचे जोडे बाजूला ठेवून शेतकरी आंदोलनाला पुन्हा तीव्रता द्यावी, असा सूर आंदोलनातून उमटला.