Rs 80 crore relief fund approved for farmers in the district : अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Akola २०२४-२५ च्या खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने जिल्ह्यासाठी ७९ कोटी ४८ लाख रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने १८ मार्च रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगामाच्या पेरणीनंतर महिन्याभरातच झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोला, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर या सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने तातडीने बाधित क्षेत्राचा पंचनामा करून २७ सप्टेंबर २०२४ रोजी शासनाला संयुक्त अहवाल पाठविला होता. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शासनाने नुकसानीची दखल घेत मंगळवारी (१८ मार्च) मदत निधी मंजूर केला आहे.
राज्यातील ५६,७४८ शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळणार असून, पुढील आदेशानुसार मदत निधी वितरित केला जाणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार मदत यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात येईल. कोणत्याही बँकेने हा निधी कर्ज खात्यात समायोजित करू नये किंवा वसुलीसाठी वापरू नये. याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असेल आणि त्यांनी बँकांना आवश्यक ती सूचना द्यावी, असे कळविण्यात आले आहे.
Yogesh Sagar : विधानसभेत गाजली HSRP, वेबसाईटमधून सरकारचा सायबर फ्रॉड !
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७,३८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यामध्ये प्रमुख पिकांसह काही विशेष पिकांचेही मोठे नुकसान झाले. राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार नुकसान सहन करावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना हा मदत निधी मोठा दिलासा देणारा आहे. आगामी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच हा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना नव्या पेरणीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे.