Soybean crop destroyed by humani worms, farmer couple commits suicide : घटनेने प्रशासन हादरले; सरकारच्या ढिसाळ धोरणांचा शेतकऱ्यांना फटका
Buldhana राज्य सरकारच्या कृषी धोरणांचा आणि पीक विमा व्यवस्थेच्या अपयशाचा बळी ठरत, बुलडाणा जिल्ह्यातील भरोसा शिवारात हुमणी अळीमुळे सोयाबीनचे नुकसान झाल्यानंतर दोन बँकांच्या कर्जाच्या ताणाखाली शेतकरी दाम्पत्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मृतकांमध्ये गणेश श्रीराम थुट्टे (५४) आणि त्यांची पत्नी रंजना गणेश थुट्टे (५०) यांचा समावेश आहे. दोघांनाही दोन मुलगे व एक मुलगी असून तिन्ही अपत्यांचे विवाह झालेले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
थुट्टे कुटुंबाकडे भरोसा शिवारात एकूण ५ एकर कोरडवाहू शेती होती. उन्हाळ्यात शेळ्यांवर आधार ठेवणाऱ्या या कुटुंबाने यंदा सोयाबीन व मकाची पेरणी केली होती. मात्र हुमणी अळीच्या प्रचंड प्रकोपामुळे सोयाबीनचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले. या शेतीसाठी थुट्टे यांनी सेंट्रल बँक गांगलगाव शाखेकडून २ लाख रुपये व बँक ऑफ महाराष्ट्र मेरा खुर्द शाखेकडून ५ हजार रुपये असे एकूण २.०५ लाखांचे पीककर्ज घेतले होते.
Vijay Ghadge : अजित पवारांची भेट घेतली विजय घाडगे यांनी उपस्थित केले प्रश्न
पीक उध्वस्त झाल्यानंतर उरलेले कर्ज कसे फेडावे? पुन्हा शेतीसाठी काय पेरावे? या विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने मंगळवारी (२४ जुलै) दुपारी साडेचारच्या सुमारास आपल्या शेतात गळफास लावून जीवन संपवले.
घटनेच्या वेळी त्यांची सून ३ वर्षीय मुलीला घेऊन शेळ्या चारण्यासाठी शेजारी गेली होती. परत आल्यानंतर सासू-सासरे दिसले नाहीत म्हणून ती शोधण्यासाठी निघाली असता हे दृश्य तिच्या नजरेस पडले. आरडाओरड केल्यावर शेजारी धावून आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथे पाठवले. या दुर्दैवी घटनेने प्रशासनासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
CJI News : सेवानिवृत्तीनंतर राजकारण किंवा सरकारी पद घेणार नाही
या घटनेमुळे शासनाच्या “शेतकरीहिताच्या” दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरवर्षी लाखो रुपये पीकविमा योजनेसाठी खर्च होतो, मात्र अंमलबजावणी मात्र कागदोपत्रीच राहते, हे अशा घटना अधोरेखित करतात. स्थानिक प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी आणि संबंधित बँकांवर तगादा लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.








