..so Modi should tell farmers, ‘Don’t sow soybeans’ : सोयाबीन उत्पादकांना ५ हजार कोटींचा फटका !
Wardha : यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसला. हा धोका यावर्षीच नाही तर आता पुढील हंगामासाठीही राहणार आहे. सरकारने भावांतर योजनेमार्फत ही भरपाई केली, तरच शेतकऱ्यांची क्रयशक्ती टिकेल, अन्यथा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरू नये, असे मोदी सरकारने जाहीर करावे, असे शेती अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून म्हटले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना जावंधिया म्हणाले, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनच्या बाजारात मंदीचे वातावरण होते. भारत सरकारने सन २०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी सोयाबीनचे हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केले होते. परंतु बाजारात केवळ ४ हजार ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलच दर मिळत आहेत. त्यामुळे राज्यभरात सोयाबीन उत्पादकांना जवळपास ५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला.
महाराष्ट्रात ५० लाख हेक्टर म्हणजे १ कोटी २५ लाख एकर शेतीवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. एकरी ४ क्विंटल जरी उत्पादन विचारात घेतले तरी ५ कोटी क्विंटल उत्पादन होते. एका क्विंटलमागे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी दर मिळाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना ५ हजार कोटींचा फटका बसला आहे.
भारत सरकारने खाद्य तेलावर २० टक्के आयात कर वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे सोयाबीनला बाजारात चांगले भाव मिळेल असा कांगावा सुरू झाला. आयात कर वाढीमुळे जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल भाव वाढतील, पण हमीभाव मिळणार नाही, हे आधीच लक्षात आले होते. कारण सोयाबीनचे भाव हे ढेपीच्या भावावरून ठरतात.
आज अमेरिकेत सायोबीनचे भाव १५ ते १६ डॉलर प्रतिबुशेलवरून ९ ते १० डॉलर व ढेपीचे भाव ४५० डॉलर प्रति टनवरून ३२५ डॉलर प्रति टनवर आले आहे. भारतीय बाजारातही तेलाचे भाव १२० ते १३० रुपये किलो तर ढेपीचे भाव ३ हजार ५०० प्रति क्विंटलचेच आहे. त्यामुळे सोयाबीनला ४ हजारांपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता नाही, असेही विजय जावंधिया यांनी सांगितले.