Home Minister Devendra Fadnavis should take action against the police DYSP : गृहमंत्र्यांनी माजोरड्या पोलिसावर कारवाई करावी
Nagpur : जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीवायएसपीने फिल्मी स्टाईलमध्ये एका आंदोलकाला लाथ मारली. हे वर्तन पोलिसांना शोभते का? मंत्र्यांसमोर हे कृत्य करून त्या डीवायएसपीला मोठे कर्तव्य बजावल्यासारखे वाटत असेल. पण हे पूर्णतः चुकीचे आहे. गृहमंत्र्यांनी त्या पोलिसावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात वडेट्टीार यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘स्वातंत्र्यदिनी जालन्यात झालेला हा प्रकार म्हणजे पोलिसांची माजोरडी वृत्ती दिसते. पालकमंत्र्यांसमोर आम्ही किती काम करतो, हे दाखवताना सामान्य माणसाला लाथ मारणे हा त्या खाकी वर्दीचा अपमान आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण फक्त तुम्ह्लाला पटत नाही म्हणून लाथ मारणे चूक आहे. गृहमंत्र्यांनी या माजोरड्या पोलिसावर कारवाई करावी. म्हणजे पोलिस दलात कुणाचीही सामान्य जनतेला लाथ मारण्याची हिंमत होणार नाही.’
गोपाळ चौधरी नामक एका आंदोलकाला मंत्री पंकजा मुंडे यांना भेटून त्याच्या तक्रारीचे निवेदन द्यायचे होते. दरम्यान पोलिसांनी त्याला पकडले. पकडून घेऊन जात असताना डीवायएसपी अनंत कुळकर्णी मागून धावत जाऊन त्या आंदोलकाच्या कमरेत लाथ घातली. हा व्हिडिओ पाहता पाहता सोशल मिडियावर व्हायरल झाला. सिनेमात पोलिस ज्याप्रमाणे गुंडांना लाथांनी मारतात, त्याचप्रमाणे डीवायएसपीने आंदोलकाला लाथ मारली. त्यानंतर पोलिसांच्या गुंडागर्दीवर ताशेरे ओढले जात आहेत.
गोपाळ चौधरी तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. तरीही त्यांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांना पंकजा मुंडे यांना निवेदन द्यायचे होते. ते निवेदन द्यायला जात असताना हा प्रकार घडला. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीने पळून जाऊन परपुरूषासोबत लग्न केलं आहे. मात्र पोलिसांनी पैसे खाल्ल्यामुळे तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येत असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांना भेटून निवेदन देऊ द्या, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा गोपाळ चौधरी यांनी दिला होता.
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाने महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेल टाकले. त्यामुळे आम्हाला बळाचा वापर करावा लागला, असे स्पष्टीकरण लाथ मारणाऱ्या डीवायएसपीने दिले. आदल्या रात्री त्याने पोलिस ठाण्यातही गोंधळ घातल्याचे डीवायएसपीने म्हटले आहे. असे असेल तर तेव्हाच चौधरीवर गुन्हा का दाखल केला नाही, असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.