Congress Slams Centre Government Over GST : गेली आठ वर्षे जो ज्यादा टॅक्स वसूल केला, त्याचे उत्तर द्या
Nagpur : केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्याची घोषणा केली. येत्या २२ तारखेपासून म्हणजे घटस्थापनेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयाअंतर्गत १२ आणि २८ टक्क्यांची श्रेणी काढून टाकण्यात आली आहे. आता ५ आणि १८ टक्के अशा दोन श्रेणी असणार आहेत. आरोग्य आणि आयुर्विम्यावरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. तेलापासून ते आयुर्विम्यापर्यंत जीएसटी काढून टाकण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयावर मात्र काँग्रेसने टिकास्त्र सोडले आहे.
यासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी X वर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘हे सरकार जेव्हा लोकांवर अन्यायकारक जीएसटी लादत होते, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आवाज उठवला होता आणि जीएसटीला विरोध केला होता. जीएसटी कर कमी करावा, त्यावर कॅप लावावी, ही मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने करत आले आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्य़ा आहेत. यामध्ये फटका बसू नये, या भितीने सरकारने आज जीएसटी कमी केला. याचेसुद्धा श्रेय केंद्र सरकारला घ्यायचे आहे.
गेली आठ वर्ष देशातील जनतेला लुटले, याची जबाबदारी सरकार घेणार आहे का, जर जीएसटी कमी करता येत होता, तर गेली आठ वर्ष का कमी केला गेला नाही, या प्रश्नांची उत्तर सरकार देणार आहे का, असा प्रश्नांचा भडीमार वडेट्टीवार यांनी केला. जनतेकडून आठ वर्षे ज्यादा टॅक्स का वसूल केला, याचे उत्तर आधी सरकारने द्यावे नंतर श्रेय घ्यावे. आधी लोकांना लुटले आणि आता दिवाळी साजरी करत आहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.








