Vadettiwar, Patole, Jayant Patil broke down due to increasing crime : घुग्घुसमधील गोळीबार आणि मजुराच्या खूनावर तापवले सभागृह
Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे काँग्रेसचे नेते राजू रेड्डी यांच्यावर झालेला गोळीबार आणि उद्गीरमध्ये ठेकेदाराने मजुराला इतकी बेदम मारहाण केली की, त्यात उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला. या घटनांवरून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले.
काल (१० मार्च) काँग्रेसचे नेते राजू रेड्डी घरी क्रिकेट मॅच बघून बाल्कनीत आले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही. नाहीतर जागीच त्यांच्या मृत्यूसुद्धा होऊ शकला असता. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितल्याप्रमाणे ही गंभीर घटना आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षांवरही गोळीबार झाला होता. त्यानंतर काल ही घटना घडली. कायदा, सुव्यवस्था आहे कुठे, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
हा राजकीय हेतूने झालेला गोळीबार आहे की अन्य कुठल्या कारणाने, याची चौकशी गृह विभागाने करावी. हल्लेखोर कुठल्या पक्षाचे आहेत? कोण आहेत? गोळीबार का झाला? अद्याप कारवाई का नाही झाली, याचे उत्तर सरकारने द्यावे. तात्काळ कारवाई झाली नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांनी निष्पक्ष चौकशी करावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
उदगीर शहरातील तानाजी सोनकांबळे या मजुराला ठेकेदार मेहेराज पटेल याने बेदम मारहाण केली. कारण काय तर मजुरी केल्यावर ठेकेदार त्याला जेवण आणि दारू देत होता. ते देण्याऐवची पैसे देण्याची मागणी तानाजीने केली. ५ मार्चला गरूड चौकात त्याला बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान तानाजी सोबकांबळेचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा त्याचे नातेवाईक आणि दलित समाजाच्या लोकांनी घेतला. शहरात दलित समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्या ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करावा आणि मजुराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.