Vijay Wadettiwar claims transfers in the RTO are being carried out through suspended officials : खरमाटे-भुयार टोळीचा बंदोबस्त करण्याचा वडेट्टीवारांचा इशारा
Nagpur राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आरटीओ (प्रादेशिक परिवहन विभाग) विभागातील कथित भ्रष्टाचाराचा पाढा वाचत खळबळ उडवून दिली आहे. आरटीओचे निलंबित अधिकारी खरमाटे आणि भुयार हे संपूर्ण विदर्भात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आणि वसुलीचे मोठे रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
या रॅकेटचा पर्दाफाश करताना वडेट्टीवार म्हणाले की, खरमाटे नावाचे गृहस्थ सध्या सेवेत नसतानाही बदल्यांचे संपूर्ण सूत्रे हलवत आहेत. त्यांना अकोल्यात कार्यरत असलेले भुयार नावाचे अधिकारी साथ देत आहेत. याशिवाय, निलंबित झालेले योगेश नागरे आणि खैरनार हे देखील या चौकडीत सामील असून हे चौघे मिळून संपूर्ण महाराष्ट्रातून बेकायदेशीर वसुली करत आहेत.
Buldhana Zilla Parishad : ऑडिट टाळले, रेकॉर्ड दडवले; निष्काळजीपणामुळे नऊ ग्रामसेवक निलंबित
वडेट्टीवार यांनी पुढे माहिती दिली की, विदर्भातून आरटीओमध्ये नवनियुक्त झालेल्या ६४ उमेदवारांना पोस्टिंगसाठी ही चौकडी पैशांची मागणी करत आहे. विदर्भातील कर्मचाऱ्यांचे प्रमोशन रोखण्यासाठी खरमाटे प्रयत्नशील असून, विरोध करणाऱ्यांविरुद्ध खोटे ट्रॅप लावणे किंवा बनावट एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. माझे ऐकले नाही तर तुम्हाला नेस्तनाबूत करीन, अशा स्वरूपाच्या धमक्या नव्या कर्मचाऱ्यांना दिल्या जात असून, याचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.
या सिस्टिममध्ये खैरनार नावाचा व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ‘ओव्हरलोड’ गाड्यांना मोकळीक देतो, तर योगेश नागरे हा नागपुरात बसून खरमाटे यांच्या नावाने सर्वांना धमकावण्याचे काम करतो. आरटीओची संपूर्ण यंत्रणाच या टोळीने ‘हायजॅक’ केली असून, अकोल्यात बदली होऊनही भुयार हा अधिकारी संपूर्ण विदर्भाचा कारभार अनधिकृतपणे हाताळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Vidarbha Farmers : युद्धाचा परिणाम, खत टंचाईची शक्यता; युरिया-डीएपी पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना देणार आहे. ज्या दिवशी हे वसुलीखोर मला विदर्भात दिसतील, त्या दिवशी मी स्वतः त्यांचा बंदोबस्त करीन, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. या विषयावर विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडली होती, मात्र वेळेअभावी त्यावर चर्चा होऊ शकली नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. या आरोपामुळे आरटीओ वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.








