Why security for Koratkar who defamed Chhatrapati Shivaji Maharaj? : विजय वडेट्टीवारांचा सवाल; सरकारवर हल्लाबोल
Nagpur तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याचे पाय आता चांगलेच खोलात गेले आहेत. कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकल्यावर ते रिकाम्या हाताने परतले. पण निराश झालेले नाहीत. ते कुठल्याही परिस्थितीत त्याला अटक करून घेऊन जाण्यासाठीच आले आहेत. यादरम्यान राजकीय नेत्यांशी जवळीक दाखविणाऱ्या कोरटकरच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकवटले आहेत. काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते लिजय वडेट्टीवार यांनी तर सरकारलाच धारेवर धरले आहे.
इतिहास अभ्यास इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिल्याच्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. या प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले व त्याच्या निवासस्थानी छापा टाकला. मात्र कोरटकर हा अगोदरच फरार झाला होता. या प्रकरणात शिवप्रेमी आक्रमक झाले असताना काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्यात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सुरक्षा दिली जाते. राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असेल यांच्यावर कारवाई होत नाही. उलट ते संघाशी RSS संबंधित असल्याने त्यांना अभय दिले जाते. भाजप यांच्या विरोधात निषेध करत नाही, आता तोंडं का शिवली गेली, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
नागपूर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. कोरटकरच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराला सुरक्षा प्रदान केली होती. कोरटकरचे घर बेसा-मनीषनगर परिसरात आहे. बेलतरोडी पोलिसांच्या हद्दीत त्याचे घर आहे. प्रकरण पेटत असतानाच बेलतरोडी पोलिसांनी त्याचे घर ताब्यात घेतले. घराबाहेर सशस्त्र पोलिसांची सुरक्षा प्रदान केली. पोलिसांच्या एवढ्या तत्परतेबद्दल लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.