Vijay Wadettiwar : मुख्यमंत्रीच सर्व जिल्ह्यांत झेंडा फडकविणार का?

नागपूर

Will the CM hoist the flag in all the districts? : प्रजासत्ताक दिनावरून विजय वडेट्टीवारांचा सवाल

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारने अद्यापही पालकमंत्र्यांची घोषणा न केल्यावरून हल्लाबोल केला आहे. चांगले बहुमत मिळाल्यावरदेखील अद्याप सरकारला पालकमंत्र्यांची नावे घोषित करता आलेली नाही. प्रजासत्ताक दिनाअगोदर ही नावे घोषित होणार असे सांगण्यात येत आहे. मात्र केवळ झेंडा फडकविण्यापुरतेच हे पालकमंत्री राहणार का? मुख्यमंत्री फडणवीस हेच मंत्रालयातून प्रत्येक जिल्ह्यातील झेंडे फडकविणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नागपुरात Nagpur ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बहुमत मिळाल्यावरदेखील सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे चित्र आहे. काही आमदार तर केवळ मलिदा खाण्यासाठीच जिंकले की काय असे वाटत आहे. जनतेला सरकारने अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने कमीत कमी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.

गुरुवारी मंत्रीमंडळाची बैठक असून खातेवाटप झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक ठरेल. सरकारने जी आश्वासने दिली होती त्याची पुर्तता होते की नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. लाडक्या बहिणींनी मते दिली होती. आता त्यांना 2100 रुपये मिळणार का व आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, याकडेदेखील लक्ष लागले आहे. राज्यात मंत्र्यांच्या खात्यांची तर घोषणा झाली, मात्र काही जणांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही. मंत्र्यांमध्ये अधिकार, बंगले यावरून वाद सुरू आहेत. असे मंत्री राज्याला कुठल्या दिशेने नेत आहेत असाच सवाल पडतो आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

वाल्मिक कराडचे होऊ शकते एन्काऊन्टर

वाल्मिक कराडसाठीच Walmik Karad पोलिसांनी ठाण्यात बेड नेले होते. लॉकअपमध्ये वाल्मिक कराडचे लाड पुरविले जात आहे. याची सखोल चौकशी करायला हवी. मोठ्या आकाला वाचविण्यासाठी कराडचा एन्काऊन्टर होऊ शकतो अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. सरकारने असे कुठलेही पाऊल उचलू नये असे वडेट्टीवार म्हणाले. या प्रकरणामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. सरकारने सीआयडीची एसआयटी नेमली आहे. मात्र पोलिसांची एसआयटी नेमूनदेखील काम होऊ शकत होते. सरकारला पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही का असाच सवाल उपस्थित होत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

भुजबळांचा केवळ मतांसाठी वापर

महायुतीने छगन भुजबळांसारख्या Chagan Bhujbal ओबीसी OBC नेत्यांना सत्तेबाहेर ठेवले. त्यांचा केवळ मते मिळविण्यासाठी उपयोग करण्यात आला व सरतेशेवटी त्यांच्या हातात भोपळाच दिला. हे सरकार ओबीसींच्या भावनांशी खेळणारे सरकार आहे .मुंडेंची विकेट निघाल्यावर भुजबळ यांचा समावेश मंत्रीमंडळात होऊ शकतो. अजित पवार गप्प बसल्यामुळे कुछ तो गडबड है असेच दिसत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला.