The famous novelist will preside over the literary conference in Satara : साहित्य महामंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब
Pune : जानेवारी महिन्यात सातार्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. आज पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
या प्रतिष्ठेच्या पदासाठी रंगनाथ पठारे, बाळ फोंडके यांच्यासह विश्वास पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना देखील महामंडळाने विनंती केली होती. मात्र, नेमाडेंनी यापूर्वीच नकार दिल्याने अखेर विश्वास पाटील यांचं नाव निश्चित झालं.
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील लोकप्रिय आणि प्रभावी कादंबरीकार आहेत. त्यांच्या ‘पानिपत’ या ऐतिहासिक कादंबरीने मराठी वाचकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. ऐतिहासिक संशोधन, भाषेतील ताकद, आणि घटनांचं जिवंत चित्रण ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्यं मानली जातात.
पाटील यांनी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय अशा विविध विषयांवर लेखन केलं आहे. पानिपत, झाडाझडती, सिंहासन, चंद्रमुखी, महाड या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. युद्ध प्रसंग असो वा सामाजिक संघर्ष पाटील यांनी आपल्या लेखनातून मानवी भावभावनांचं प्रभावी दर्शन घडवलं आहे.
OBCs Vow to Protect Reservation : ओबीसी संघटनांचा १० ऑक्टोबर रोजी महामोर्चा
सातार्यातील संमेलन अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांच्या निवडीने साहित्यिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न साहित्यकृती आणि सशक्त विचारसरणीमुळे या संमेलनाला नवा आयाम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








