Raj and Uddhav Thackeray’s Instructions to workers to check voter lists : निवडणुका जिंकायच्या असताल तर मतदार याद्यांचा अभ्यास करा
Mumbai : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी झाल्याचा मुद्दा उघडकीस आणला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुरावेही सादर केले. याचा थेट आरोप निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर करण्यात आला. कारण निवडणूक आयोगाला प्रश्न केल्यावर भाजप नेतेच त्याला उत्तर देत होते. त्यामुळे आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर ही पत्रकार परिषद म्हणजे ढोंग असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पृष्ठभूमीवर मतचोरीचा मुद्दा चांगलाच पेटतोय.
मतचोरीच्या मुद्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकच भूमिका घेतल्याचं दिसतंय. एका माणसाला एकच मत आहे की नाही, हे घरोघरी जाऊन तपासा. कारण विधानसभा निवडणुकीत जवळपास ४० ते ४२ हजार मतदान घुसवले गेले आहे. अशा लोकांना हुडकून काढून मतदान करू देऊ नका. आपल्या वार्डात मतचोरी होतेय का, ते तपासून बघा, असा सल्ला दहीसर येथे घेतलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
दुसरीकडे राज ठाकरे यांनीही हीच भूमिका घेतली आहे. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर मतदार याद्यांचा अभ्यास करा. तुम्ही तपासल्यानंतर मतदार यादी माझ्या हातात आल्याशिवाय मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही. वरवर काहीतरी केल्यासारखं दाखवून मला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करणार असाल, तर ते चालणार नाही. पूर्ण काम करा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना खडसावले आहे. एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकारण ‘मतचोरी’ या मुद्यावरच तापणार, असे एकंदर परिस्थितीवरून दिसतंय.