Jitendra Awhads criticism of voter list conspiracy exposed : मतदार याद्यांचा कट उघड, जितेंद्र आव्हाड यांची टीका
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदार याद्यांतील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.
आव्हाड म्हणाले, “मतदार याद्यांचा हा कट नोव्हेंबर 2024 पासून सुरू आहे. निवडणूक आयोग स्थापन करताना निवडणूक समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आलं, तेव्हापासूनच या षड्यंत्राला सुरुवात झाली. आता मतदार यादी शोधण्याचा प्रयत्न केला तर एरर दाखवतो. अचानक हा एरर कसा आला? हे सगळं पूर्वनियोजित आहे.”
नागपुरात आज शरद पवार यांच्या ‘मीट द प्रेस’ नंतर पत्रकारांशी बोलताना आव्हाड पुढे म्हणाले, “निवडणूक आयोगाने एवढी पळापळ करण्याची गरज नव्हती. ‘चोर के दाढी में तिनका’ अशी स्थिती आहे. आयोग सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुलं झालं आहे. पक्षांतर कायदा पायदळी तुडवून, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पक्षच काढून दुसऱ्यांच्या हातात दिले आहेत. लोकशाहीचा पूर्णत: बट्ट्याबोळ झाला आहे.”
Vote theft case : शेवटच्या तासात 15 टक्के मते वाढली, हा गंभीर विषय !
आव्हाड यांनी उदाहरण देत सांगितले की, “बंगालच्या एका घरात 80 लोक राहतात असे दाखवले गेले. राम कमलदास नावाच्या माणसाला 45 पोरं दाखवली आहेत. ही भारतीय लोकशाहीची थट्टा आहे. आता तर निवडणुकीचा निकाल आधीच जाहीर करून टाका, निवडणुकीची काही गरज उरलेली नाही.” त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांनी यावर सुमोटो चौकशी सुरू करण्याची मागणी केली आणि मुख्यमंत्री व सत्ताधाऱ्यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही केली. हे असंच सुरू राहिलं तर येत्या २० वर्षांत या देशात लोकशाही संपुष्टात आलेली दिसेल, असे भाकितही जितेंद्र आव्हाड यांनी वर्तवले.