No action taken after 4000 names given, serious allegation by MLA : 4000 नावे दिली कारवाई नाही, आमदाराचा गंभीर आरोप
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्तींची नावे, स्थानांतरित अधिकाऱ्यांची नावे तसेच दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांची यादी अद्याप कायम असल्याचे त्यांनी सांगितले. “मी जिल्हाधिकाऱ्यांना अशा चार हजार मतदारांची यादी दिली आहे, पण त्यावर अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही,” असा थेट आरोप गायकवाड यांनी केला.
गायकवाड यांनी सांगितले की, “बुलढाण्यात अनेक मतदारांचा मृत्यू होऊन पंधरा वर्षे झाली आहेत, तरी त्यांची नावे यादीतून वगळली गेलेली नाहीत. इतकेच नव्हे, तर पंधरा वर्षांपूर्वी येथे कार्यरत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांची नावे देखील अजून मतदार यादीत आहेत.” त्यांनी स्पष्ट केलं की, जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि निवडणूक आयोगाकडे वारंवार तक्रारी करूनही बोगस नावे काढण्यात येत नाहीत. “निवडणूक आयोगालाही यासंदर्भात माहिती दिली असता, त्यांनी ‘बोगस नावे काढू नका’ अशी भूमिका घेतली,” असा धक्कादायक दावा आमदार गायकवाड यांनी केला.
Vote theft case : आयोगाच्या सर्व्हरवर खासगी व्यक्तीचे नियंत्रण!
त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागात राहणारे अनेक मतदार शहरी भागात मतदान करण्यासाठी नाव नोंदवतात, त्यामुळे अशा व्यक्तींकडे दोन ठिकाणी मतदार यादीत नावे असतात. “अशा मतदारांकडून दुहेरी मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा गंभीर संशय त्यांनी व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करत गायकवाड म्हणाले की, “राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांची महायुती व्हावी, अशी सर्व नेत्यांची इच्छा आहे. बुलढाणा जिल्ह्यात युती करण्याचा कल स्पष्ट आहे. मात्र अंतिम निर्णय बैठकीनंतर घेतला जाईल.”
Reservation controversy : जीआरविरोधात रान उठवणाऱ्या ओबीसी नेत्यांसह जरांगेंना धक्का !
संजय गायकवाड यांनी या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “संजय राऊत ही विध्वंसक प्रवृत्ती आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला आणि आता आघाडीतील पक्ष संपवण्याचं काम करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेसला ते मान्य होणार नाही, हे आम्ही आधीच सांगितलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.
गायकवाड म्हणाले, “एका मतदारांपर्यंत तीन विविध पक्षांच्या भूमिका गेल्या, तर मतदार गोंधळतो आणि त्याला ते पटत नाही. त्यामुळे आघाड्यांमधील मतभेद आणि गोंधळाचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो.”
बुलढाण्यातील या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि आयोगाकडून या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_____