29.32 crore worth of liquor seized : हजारांवर गुन्हे; 1114 आरोपींना बेड्या
Wardha जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असल्याने शासनाने जिल्ह्यात 1947 मध्ये जिल्ह्यात दारूबंदी केली. तेव्हापासून वर्धा जिल्ह्यात दारूविक्री हा गुन्हा ठरविला जातो. याअंतर्गत जिल्ह्यात पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर छापा टाकून जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तब्बल 7 हजार 476 गुन्ह्यांची नोंद केली. यात 1 हजार 114 आरोपींना अटक करून 29 कोटी 32 लाख 85 हजार 326 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दारूबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलिस व उत्पादन शुल्क विभागावर सोपविली. मात्र, या दोन्ही विभागांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात दारूबंदीचे तीनतेरा वाजले आहे. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये जेवढी दारू मिळत नाही, त्यापेक्षा अधिक दारू वर्धा जिल्ह्यात विकल्या जाते. दारू सुरू असलेल्या जिल्ह्यांमध्ये केवळ दारू दुकानातच दारूविक्री होते. मात्र, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी गल्लीबोळात अवैध दारूची दुकाने थाटण्यात आली आहे व ही दुकाने स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे.
काही दुकानदारांनी तर बिअरबारलाही लाजवेल अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्यासाठी आगाऊचा चार्जही आकारला जात आहे. यामुळे दारूविक्रेते गब्बर होत चालले असले तरी अनेकांचे कुटुंब उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे दारू बंदीवर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले जात आहेत. गल्लीबोळात सुरू असलेल्या दारू दुकानांमुळे त्रस्त झालेल्या काही गावातील महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदीचा ठराव घेतला आहे. गावात दारुविक्री करत असल्याचे आढळून आल्यानंतर सदर महिला पोलिस ठाण्याला फोन करून माहिती देता.
गावकऱ्यांच्या दबावाखातर पोलिस संबंधित दारूविक्रेत्याला पोलिस ठाण्यात नेतात. मात्र, त्याच्यावर योग्य कलमा लावल्या जात नसल्याने एका दिवसातच त्याची सुटका होते. परिणामी, दारूविक्रेत्यांची हिम्मत अधिकच वाढत चालली आहे. या गुन्ह्यांवरून जिल्ह्यातील दारूविक्रीची व्याप्ती लक्षात येते, हे तितकेच खरे.
तरीही मुजोरी कायम
जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज गावठी दारू विकणारे, भट्टी चालविणारे तसेच दारूची वाहतूक करणाऱ्यांसह इतरांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, तरीदेखील दारूचे वाहणारे पाट कमी होताना दिसून येत नाही. जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील अनेक दारूविक्रेत्यांना जिल्ह्यातून तडीपार केले. पण, तरीदेखील काही मुजोर दारूविक्रेते पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे दारूविक्री करताना दिसतात. अशांना स्थानिक पोलिसांचे अभय तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होतो.
बंदी कागदावरच…
जिल्ह्यात अनेक पोलिस अधिकारी येऊन गेले. त्यांनी त्यांच्या स्तरावर दारूविक्रेत्यांवर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला. काहींचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वीदेखील झाला. अनेकांनी दारूची दुकाने बंद केली. काहींनी जिल्हाच सोडला. व्यवसाय बदलवला. मात्र, आता पुन्हा दारूची दुकाने खुली झाल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे.