Youth is getting caught in the trap of drugs : अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकतेय तरुणाई
Wardha गावठी दारूसह बनावटी दारूची प्रकरणे वर्धा जिल्ह्यात नवीन नाही. आता यात भर पडली ती मॅफेड्रॉन ड्रग्सची. गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देणाऱ्या हिंगणघाट शहरात याची पाळंमुळं घट्ट होत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे दिसून आले. गेल्या अकरा महिन्यांत पोलिसांनी तब्बल ५२.३६० ग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण २२ लाख ७० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावरून जिल्ह्याला डृग्स तस्करांचा विळखा पडल्याचे स्पष्ट होते.
वर्धा शहरात व शहरालगत मोठी महाविद्यालये, विद्यापीठ आहे. येथे शिक्षणासाठी बाहेर गावातून, जिल्ह्यातून, राज्यातून विद्यार्थी येतात. अनेक जण मौज करण्याच्या नावाखाली या अमली पदार्थांचे सेवन करतात. सावंगी परिसरात बंद खोल्यांच्या आत पार्टीच्या नावाखाली हुक्का पार्ट्याही रंगतात. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हे स्पष्ट झाले होते. त्यात आता नशा करण्यासाठी महानगरातील मॅफेड्रोन ड्रग्सची क्रेझ वाढत आहे. गेल्या अकरा महिन्यांत पोलिसांनी ५२.३६० ग्रॅम ड्रग्ससह २२ लाख ७० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाढत्या एमडी ड्रग्जच्या कारवाईने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय असल्याचे सिद्ध झाले. त्याची पाळंमुळं शहरासह, परराज्यांत खोलवर रुजल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे तरुणींही या व्यसनांच्या आहारी गेल्या आहेत. या अमली पदार्थ्याच्या विक्रीचे रॅकेट उखडून टाकण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
ओसाड रस्त्यांचे झाले अड्डे
रात्रीच्या सुमारास ओसाड रस्ते, मोकळे मैदान आणि शहरातील नामवंत टेकड्या नशेखोरांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या अमली पदार्थांमुळे तरुणाईला नशेची चटक लागली आहे. यात गांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. १५ ते २५ वयोगटातील तरुण अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोण आहे पुरवठादार?
दोन वर्षापूर्वीपर्यंत मॅफेड्रोन ड्रग्स केवळ महानगरात वापरत असल्याचे ऐकिवात होते. मात्र, गेल्यावर्षी पहिल्यांदा जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई केली. त्यात १७ ग्रॅम ७० मिलीग्रॅम ड्रग्स जप्त केले होते. गेल्या अकरा महिन्यांत विविध ठिकाणी कारवाईत ५२.३६० ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट आहे. याचा पुरवठा कोण करतो, याचा ठावठिकाणा अद्याप लागला नाही. ड्रग्सची पाकिटे लहान असल्याने ते सहज घेऊन जाणे शक्य आहे. मात्र, ते नेणारे पोलिसांच्या रेकॉर्डवर नसल्यामुळे कारवाईस अडचणी होतात.








