The lock of the temple office opened with the intervention of Police : विठ्ठल-रखुमाई देवस्थान अध्यक्षाविरोधात प्रचंड रोष
Wardha जिल्ह्यातील घोराड येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थान अध्यक्षाविरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे देवस्थान कार्यालयाला ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्थीने शनिवारी कुलूप उघडण्यात आले. या घटनेची सध्या वर्धा जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे.
देवस्थानच्या कार्यालयाला सोमवारी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते. कुलूप पाच दिवस कायम होते. पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांनी देवस्थानचे सचिव सुरेश धंदरे, पोलिस पाटील नीलेश गुजरकर यांच्यासह ग्रामस्थांमध्ये चर्चा घडवून आणली. त्यानंतर शनिवारी (दि. ४ जानेवारी) सायंकाळी ठाकूर यांनी सचिवांच्यासमोर कार्यालयाला ठोकलेले कुलूप उघडले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिवांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. देवस्थानच्या अध्यक्षाविरोधात असलेला रोष यावेळीही ग्रामस्थांमध्ये दिसून आला.
देवस्थानात सातपैकी कमिटीत केवळ तीन जण आहे. हिंगणी येथील अध्यक्ष आणि दहेगाव येथील सचिव आहे. एक विश्वस्त असून, ते वयोवृद्ध आहेत. अध्यक्ष गावकऱ्यांसोबत उर्मट वागतात. त्यामुळे ग्रामस्थांनी देवस्थान कार्यालयाला कुलूप ठोकले होते. मात्र, काही दिवसांवर आलेला संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव पाहता सहमतीने ठाणेदारांनी तोडगा काढला.