19 villeges struggling for water, 7 villeges totally depend on Tankers : पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष; सरकारी नियोजनाचा बट्याबोळ
Buldhana एप्रिल महिन्यात उष्णतेचा कहर वाढत असतानाच जलस्रोतांचे आटण्याचे संकटही गडद होत आहे. बुलढाणा तालुक्यातील अनेक गावांत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहेत. सध्या तालुक्यात १९ गावे तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. यातील ७ गावांना टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या नियोजनाचा पूर्ण बट्याबोळ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांत तापमान झपाट्याने वाढले असून त्यासोबतच भूगर्भातील जलपातळीही झपाट्याने घसरली आहे. तालुक्यातील प्रमुख जलस्रोत कोरडे पडले असून अनेक ठिकाणी जलजीवन मिशनच्या योजनेतील पाईपलाईनसुद्धा निष्क्रिय झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने १९ गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहीत करून पाणीपुरवठ्याची तात्पुरती सोय केली आहे.
Vijay Wadettiwar : जग कुठे चाललं अन् हे कबरीच्या मागे लागले !
श्रीकृष्णनगर, भालगाव, कोलारा, धोडप, पळसखेड सपकाळ, किन्ही नाईक आणि हिवरा नाईक या गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. श्रीकृष्णनगर, भालगाव आणि कोलारा येथे मार्चपासून तर उर्वरित चार गावांत एप्रिलपासून टॅंकरची सेवा सुरू आहे.
महिमळ, बोरगाव वसु, दिवठाणा, पेठ, अंत्रीकोळी, मंगरूळ ई., डासाळा, पळसखेड जयंती, वैरागड, आमखेड, हातणी, कवठळ, यासह इतर अनेक गावांत खासगी विहिरींच्या अधिग्रहणावरच पाणीपुरवठा सुरू आहे. विकतचे पाणी मिळणे अशक्यप्राय झाले असून काही गावांत कृत्रिम पाणीटंचाईही तांत्रिक कारणांमुळे निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता आणि धरणांत पुरेसा साठा असल्याने यंदा पाणीटंचाईचे संकट टळेल अशी अपेक्षा होती. मात्र डिसेंबरपासूनच टंचाईने डोके वर काढले आणि सध्याच्या स्थितीत परिस्थिती गंभीर बनली आहे.