Water shortage hits tanker-free Gondia district : पिण्याच्या पाण्यासाठी लोक टँकरवर अवलंबून
Gondia गोंदिया जिल्हा राज्यात ‘टँकरमुक्त’ म्हणून ओळखला जातो, मात्र उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. विशेषतः गोंदिया शहरातील काही परिसरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था सुरू केली आहे.
शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी गोंदिया नगर परिषद सतर्क झाली आहे. यावर्षीची उष्णता लक्षात घेता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच टँकर पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. सद्यस्थितीत नगर परिषदेकडे एकच टँकर उपलब्ध असला, तरी गरज भासल्यास कंत्राटी तत्त्वावर खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
Ramdas aathavle : आठवले स्पष्टच बोलले, ‘मोदी देवाचा अवतार नाहीत’
नगर परिषद अभियंता नितीन गौरखेडे यांनी सांगितले की, “गोंदिया शहरात उन्हाळ्याच्या कालावधीत काही भागांत पाण्याचा तुटवडा जाणवतो. अशावेळी टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करणे गरजेचे ठरते. यासाठी अग्निशमन विभागातील बोअरवेलचे पाणी वापरले जाते. नगर परिषदेने यावर्षीही निविदा काढून टँकरपुरवठा करण्यासाठी कंत्राट दिले आहे.”
पाण्याच्या टँकरसाठी पाण्याचा मुख्य स्रोत ठरणारा अग्निशमन विभागातील बोअरवेल यंदाही उपयुक्त ठरणार आहे. या बोअरवेलमध्ये भरपूर पाणीसाठा असल्याने ते टँकरमध्ये भरून गरजूंना पुरविले जाते. हे पाणी पिण्यायोग्य असल्याने नागरिक त्याचा वापरही समाधानाने करत आहेत.
सध्या एप्रिल महिन्यातच उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने मे महिन्यात काय स्थिती असेल, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, काही भागांत भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. त्यामुळे प्रशासनाला टँकर पुरवठ्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे.
पाण्याची टंचाई ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नगर परिषद प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करून पाण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या गरजा वाढत असतानाच, गोंदिया नगर परिषदेचा हा टँकर पुरवठा उपक्रम नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बाब आहे. आगामी काळात टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाच्या या प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसाद आणि सहकार्य लाभणे ही काळाची गरज आहे.