Angry citizens stormed the municipal council office for water : खामगाव नगर परिषद कार्यालयावर धडकले; दोषी कंत्राटदारावर कारवाईची मागणी
Buldhana खामगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये गेल्या १८ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ५ मे रोजी दुपारी १२ वाजता नगर परिषद कार्यालयावर धडक देत ‘घागरफोड’ आंदोलन छेडले. या भागात कूपनलिका, विहिरी वा कोणताही पर्यायी जलस्रोत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना भीषण उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
तांत्रिक बिघाड आणि पथदिवे बसवण्यासाठी जेसीबीने खोदकाम करताना पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने या भागात पाण्याचा पुरवठा पूर्णतः बंद झाला आहे. या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या आंदोलनावेळी संतप्त नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांना घेरून जोरदार वाद घातला. “उन्हाळ्यातही जर पाणी मिळणार नसेल, तर आम्ही जायचं कुठे?” असा सवाल करत नागरिकांनी दोषी कंत्राटदारावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पाण्याच्या मुख्य जलवाहिनीचे नुकसान झाल्यानंतर ती अद्याप दुरुस्त न झाल्यामुळे पाणीपुरवठा कोलमडल्याचे नगर परिषदेचे पाणीपुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकूर यांनी स्पष्ट केले. याआधी कचरा जाळल्यामुळे जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडला होता. तसेच विजेचे खांब थेट जलवाहिनीवर बसवले गेले होते. अशा घटना वारंवार घडत असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याची नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.