Minimum temperature likely to drop to 4 degrees : किमान तापमानात ४ अंशांपर्यंत घसरणीची शक्यता
Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून, आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठे बदल होणार असून थंडीची लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असताना, महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी थंडी कमी झाल्याचे चित्र होते. मात्र, ही गायब झालेली थंडी पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात शीतलहरीचा प्रभाव अधिक जाणवेल. कमाल तापमान साधारणतः ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता असून, सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल, तर दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
Sandeep Joshi : मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या नेत्याचा ‘थांबण्याचा’ निर्णय
मराठवाड्यात किमान तापमानात हळूहळू वाढ होईल, मात्र त्यानंतर पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली असून, पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील किमान तापमानाबाबत बोलायचे झाल्यास, धुळे येथे सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ आणि परभणी येथे १० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तापमानातील या चढउताराचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित आजार वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि परिसरात मात्र पुढील दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे शहरात उकाडा वाढल्याचे जाणवत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून, उन्हाचा कडाका कायम राहू शकतो.
दरम्यान, वातावरणात सातत्याने बदल होत असतानाच वायू प्रदूषणात झपाट्याने वाढ होत असल्याचेही चित्र आहे. यामुळे श्वसनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीसह देशातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनला असून, पावसामुळे काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Malkapur Congress : स्वीकृत नगरसेवक निवडीत अन्याय, निष्ठावानांची निर्धार सभा
एकीकडे राज्यात थंडीचा जोर वाढत असताना, दुसरीकडे दुपारच्या उकाड्यामुळे नागरिकांना दुहेरी हवामानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.








