womens world cup : इतिहास रचला, भारतीय महिलांचा विश्वविजयी जल्लोष!

Cricket faith salute from Sachin to Kohli : सचिनपासून कोहलीपर्यंत क्रिकेट विश्वाचा सलाम”

Mumbai : भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या महिला विश्वचषकाचं विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आपल्या पहिल्या आयसीसी किताबावर नाव कोरलं आणि संपूर्ण देशाला अभिमानाने उंच केलं. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी दणदणीत विजय मिळवत विश्वविजेतेपदावर कब्जा केला.

या ऐतिहासिक यशानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठान, हरभजन सिंह, आर. अश्विन आणि इतर अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावरून या शूरवीर मुलींचं अभिनंदन केलं.

Local Body Elections : नागपूर महानगरपालिका निवडणूक, अनेकांच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारा टप्पा !

सचिन तेंडुलकर यांनी 1983 च्या ऐतिहासिक विजयाची आठवण करून देत म्हटलं की, “1983 च्या विश्वविजयानं अनेक पिढ्यांना मोठं स्वप्न बघायची प्रेरणा दिली होती. आज आपल्या महिला क्रिकेट संघाने तेच स्वप्न नव्या रूपात साकारलं आहे. देशभरातील असंख्य मुलींना या विजयातून बॅट आणि बॉल हातात घेऊन स्वतःवर विश्वास ठेवण्याचं धैर्य मिळेल.”

अनिल कुंबळे यांनी संघाच्या शिस्तबद्ध आणि निडर खेळाचं कौतुक करत म्हटलं की, “हा विजय भारतीय संघाच्या सातत्य, संयम आणि दबावाखाली शांत राहण्याच्या क्षमतेचं दर्शन घडवतो. दक्षिण आफ्रिकेलाही त्यांच्या संघर्षशील खेळासाठी सलाम करावा लागेल.”

वीरेंद्र सेहवाग यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “चॅम्पियन्स! प्रत्येक चौकार, प्रत्येक विकेट आणि त्यांच्या जिद्दीने संपूर्ण देशाचं हृदय जिंकलं आहे. हरमनप्रीत आणि तिच्या संघाने नव्या पिढीला जिंकण्याचं आणि लढण्याचं स्वप्न दिलं आहे.”

इरफान पठान यांनी शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माच्या कामगिरीचं विशेष कौतुक केलं. ते म्हणाले, “दीप्ती, तुम्ही अप्रतिम खेळलात; शेफाली, तुमची खेळी खरंच प्रेरणादायी होती. भारतीय संघाला या महान विजयासाठी हार्दिक शुभेच्छा.”

हरभजन सिंह म्हणाले, “आपण चॅम्पियन्स आहोत! भारताचा झेंडा पुन्हा एकदा विश्वविजयी मंचावर फडकला आहे. टीम इंडियाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.” तर आर. अश्विन यांनी लिहिलं, “ही मोहीम अविश्वसनीय होती. खेळाडू, प्रशिक्षक अमोल मजूमदार आणि संपूर्ण सहाय्यक संघ यांचं योगदान अतुलनीय आहे.”

विराट कोहलीने आपल्या खास शैलीत अभिनंदन करत म्हटलं, “तुमचा निर्भय खेळ आणि आत्मविश्वास पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुम्ही संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे. हरमन आणि संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. जय हिंद.”

Winter session : हिवाळी अधिवेशन आणि विदर्भ : हुरडा पार्ट्या, पर्यंटनाच्या प्रतिमेतून गांभीर्याकडे !

डी.वाय. पाटील स्टेडियमवरील या ऐतिहासिक सामन्याला अनेक क्रिकेट दिग्गज उपस्थित होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनीही सामना प्रत्यक्ष पाहून संघाला पाठिंबा दिला.

सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्माने 87 धावा, तर दीप्ती शर्माने 58 धावा करून संघाला मजबूत पायाभरणी करून दिली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 45.3 षटकांत 246 धावांवर संपुष्टात आला. गोलंदाजीत दीप्तीने 5 बळी घेतले, तर शेफालीने 2 बळी टिपले.

भारतीय महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देश जल्लोषात आहे. क्रिकेटचा हा नवा सुवर्णकाळ केवळ विजयाचा नाही, तर भारतीय महिलांच्या सामर्थ्य, जिद्द आणि विश्वासाचं प्रतीक ठरला आहे. “म्हारी छोरियां छोरो से कम है के?” या प्रश्नाचं उत्तर आता संपूर्ण जगाला मिळालं आहे.