Youth Congress : मेळघाटात युवक काँग्रेसची ‘मनरेगा बचाव यात्रा’

Youth-congress-mgNREGA-bachao-yatra-melghat : मजुरांच्या थकीत मजुरीसाठी रस्त्यावरचा लढा छेडणार

Amravati केंद्र सरकारकडून मनरेगा कायदा कमकुवत करून तो अन्य योजनांमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नांविरोधात युवक काँग्रेसने मेळघाटात ‘मनरेगा बचाव यात्रा’ सुरू केली आहे. रविवारपासून प्रारंभ झालेल्या या यात्रेचा उद्देश सुमारे ४० हजार मजुरांपर्यंत थेट पोहोचण्याचा आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी खासदार बळवंत वानखडे यांनी मेळघाटातील मजुरांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.

मेळघाटातील मनरेगा मजुरांची मजुरी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. होळी सणापूर्वी थकीत मजुरी मिळावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीस पाठिंबा देत खासदार वानखडे यांनी मजुरांना न्याय मिळेपर्यंत रस्त्यावरचा लढा सुरूच राहील, असा इशारा दिला.

Vijay Wadettiwar : ज्यांनी अफवा पसरवली त्यांना पागल कुत्रा चावला असेल, वडेट्टीवारांचा टोला कुणाला?

युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकार ग्रामीण व आदिवासी मजुरांच्या हक्कांना कायदेशीर हमी देणारी मनरेगा योजना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करत आहे. मेळघाटातील सुमारे ४० हजार मजुरांचे जीवनमान या योजनेवर अवलंबून आहे. चिखलदरा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बोलताना खासदार वानखडे यांनी मजुरांच्या हक्कांवर कोणताही घाला घालू दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काजलडोह येथून सुरू झाली. दिवसभरात डोमा, बामादेही, काटकुंभ, बगदरी, गांगरखेडा, कोरडा, काला पांढरी आणि कामिदा अशा अतिदुर्गम गावांतून यात्रेचे मार्गक्रमण झाले. ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत आपल्या समस्या मांडल्या.

यावेळी खासदार वानखडे म्हणाले, “मेळघाटातील सुमारे ४० हजार मजूर कुटुंबे केवळ मनरेगाच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. हा कायदा कमकुवत केला गेला किंवा त्याची स्वतंत्र ओळख संपवली गेली, तर हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल. स्थलांतर वाढेल आणि आर्थिक संकट अधिक तीव्र होईल.” मनरेगा रद्द होऊ नये, यासाठी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरचा महापौर २४ कॅरेट शुद्ध भाजपचाच, भिवंडीत तुमचा आहे का?

दरम्यान, केंद्र सरकार राज्यांवर आर्थिक बोजा टाकून मनरेगा योजना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. याविरोधात कम्युनिस्ट पक्ष व त्यांच्या जनसंघटनांनी यापूर्वीच देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. आता काँग्रेसही या लढ्यात सहभागी झाल्याने येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची प्रमुख मागणी अशी आहे की, मनरेगा मजुरी प्रतिदिन किमान ४०० रुपये करावी आणि १०० दिवसांच्या रोजगाराची कायदेशीर हमी पूर्वीच्या कायद्याप्रमाणे कायम ठेवावी.