Youth Congress protest against RSS Chief : काँग्रेस कार्यालयाजवळ राडा; संघाची खाकी पँट जाळली
Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी इंदूर येथे केलेल्या एका वक्तव्याचा विरोध करत युवक काँग्रेसकडून देवडिया भवनासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्ते संघ मुख्यालयाकडे निघण्याच्या तयारीत असतानाच विनापरवानगी आंदोलन केल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
राम मंदिर बनल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य सरसंघचालकांनी काही दिवसांअगोदर केले होते. त्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी टीकादेखील केली होती. नेमके रविवारी नागपुरात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा हे नागपुरात होते. देवडिया भवनात झालेल्या बैठकीनंतर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतदेखील उपस्थित होते. युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले व आंदोलन करत संघाच्या गणवेशातील खाकी पँट जाळली. तसेच संघावर बंदी आणावी, अशा मागणीचे फलक दाखवत घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संघ मुख्यालयासमोर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विनापरवानगी आंदोलन करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी निदर्शनास आणून दिले.
मात्र कार्यकर्ते ऐकत नसल्याने थोडा वेळ पोलीस व कार्यकर्त्यांची झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरच रोखून धरले होते. अखेर आंदोलक ऐकत नसल्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
Nitin Gadkari : विदर्भाला संत्रा प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता
बंटी शेळके यांना दिलासा
युवक काँग्रेसचे नेते बंटी शेळके यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर सुधार प्रन्यासवर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी नासुप्र सभापतींना जातीवाचक शिविगाळ केली, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात बंटी शेळके यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर बंटी शेळके यांनी सोशल मीडियावरून हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.