President House surrounded, protesting against crime and corruption : राष्ट्रपती भवनाला घेराव, वाढत्या गुन्हेगारी- भ्रष्टाचाराला विरोध
New Delhi : श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळनंतर आता जगातील आणखी एका देशात Gen-Z सरकारविरोधात प्रखर आंदोलन करत रस्त्यावर उतरली आहे. मेक्सिको सिटीमध्ये हजारो युवक–युवतींच्या आंदोलनामुळे तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रपती भवनाला घेराव घातल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, ड्रग्स माफियांचा प्रभाव आणि सामान्य नागरिकांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात हे आंदोलन उफाळले आहे.
मेक्सिकोतील जनतेचा रोष अनेक महिन्यांपासून वाढत असतानाच काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती क्लाऊडिया शीनबाम यांना भररस्त्यात एका मद्यधुंद व्यक्तीकडून छेडछाड सहन करावी लागल्याची घटना देशभर चर्चेत आली. राष्ट्रपतींचीच सुरक्षा धोक्यात असेल, तर सर्वसामान्य नागरिक विशेषतः महिलांची स्थिती किती बिकट असेल, असा सवाल तरुणांनी उपस्थित केला. या प्रकरणानंतर रस्त्यावर उतरलेले आंदोलनकर्ते आता प्रचंड संख्येने नॅशनल पॅलेससमोर जमले असून पोलिस आणि सुरक्षा दल परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.
Local body election : ‘ सूरज निकलता है तो रात को डुबता भी है’, हे लक्षात ठेवा
नेपाळमध्ये काही महिन्यांपूर्वी Gen-Z च्या आंदोलनाने थेट संसद पेटवली, नेत्यांची घरं जाळली, काहींना मारहाण झाली आणि पंतप्रधानांसह अनेकांना देश सोडावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोतील परिस्थितीही तितकीच गंभीर बनू शकते का, याबाबत चर्चांना जोर आला आहे. विशेषतः भ्रष्टाचार, गुन्हेगारांचे वाढते धाडस आणि सुरक्षा यंत्रणांचा निष्क्रियपणा या कारणांमुळे मेक्सिकोतील तरुणाईचा संताप पराकोटीला पोहोचल्याचे दिसत आहे.
आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी देशातील अंतर्गत सुरक्षेला बळकटी देण्याची, ड्रग्स माफिया आणि संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर पावले उचलण्याची, तसेच सरकारी कार्यालयांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची आहे. 43 वर्षीय डॉक्टर अरिजबेथ गार्सिया यांनी सार्वजनिक सुरक्षेसाठी अधिक निधी आणि मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. डॉक्टरसुद्धा सुरक्षित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडेच मिचोआकानचे मेयर कार्लोस मान्जो यांच्या झालेल्या हत्येने देशातील राजकीय वर्तुळ हादरले आहे. ड्रग्सविरोधात रस्त्यावर उतरलेल्या मान्जो यांची 1 नोव्हेंबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुन्हेगारीविरोधात उभे राहणाऱ्या नेत्याचंही रक्षण होत नसेल, तर सुरक्षा यंत्रणांची किंमत काय, असा सरळ प्रश्न तरुणाई उपस्थित करत आहे. राष्ट्रपती शीनबाम यांच्या सुरक्षा धोरणावरही मोठा प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
मेक्सिकोमध्ये सत्तांतराची चिन्हे दिसतील का, हा प्रश्न आता गंभीरपणे चर्चिला जात आहे; तर दुसरीकडे Gen-Z च्या वाढत्या सहभागामुळे आंदोलन आणखी तीव्र रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








