Zilla Parishad Elections : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी रणनीती?

Congress’ confidence boosted by success in the municipal elections : मलकापूर–लोणार–शेगावमधील विजयाने आत्मविश्वासात भर

Buldhana पालिका निवडणुकांच्या निकालांनी जिल्ह्यात काँग्रेसची एकूण राजकीय पकड काहीशी सैल झाल्याचे चित्र असले, तरी मलकापूर, लोणार आणि शेगाव या तीन नगरपालिकांमधील कामगिरीमुळे पक्षात नवसंजीवनी संचारली आहे. महायुतीतील पक्षांमधील ‘दोस्तीतील कुस्ती’, परस्पर आरोप-प्रत्यारोप आणि अंतर्गत वादांचा फायदा घेत काँग्रेसने ११ पैकी ३ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपद मिळवत, तब्बल ६० नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व पुन्हा ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

हे यश केवळ आकड्यांपुरते मर्यादित नसून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. पक्षांतर्गत चर्चेनुसार, योग्य नियोजन, गटबाजीवर नियंत्रण, निवडणूक अर्थकारणावर अंकुश आणि बूथ पातळीवरील संघटन मजबूत केल्यास काँग्रेस जिल्हा परिषदेत पुन्हा उभारी घेऊ शकते. त्यामुळे परिस्थितीनुसार पक्षाची रणनीती बदलण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Grampanchayat Services : किराणा उधारीवर, दवाखाना उसनवारीवर!

लोणार नगरपालिकेत काँग्रेसने नगराध्यक्षपदासह २० पैकी ८ नगरसेवक निवडून आणले असून, पाच अपक्ष नगरसेवकांचा कलही काँग्रेसकडे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्तासमीकरणात काँग्रेस अधिक मजबूत स्थितीत आहे. मलकापूरमध्ये मिळालेला विजय काँग्रेससाठी खऱ्या अर्थाने ‘बुस्टर डोस’ ठरला आहे. येथे नगराध्यक्षपदासह १४ नगरसेवक काँग्रेसचे असून, अनेक वर्षांनंतर पक्षाने शहरात निर्णायक उपस्थिती नोंदवली आहे.

शेगावमध्ये नगराध्यक्ष काँग्रेसचा असला, तरी सभागृहात स्पष्ट बहुमत नाही. ‘ड्युअल पॉवर’चा पेच असतानाही पाच नगरसेवकांच्या बळावर काँग्रेसने आपले राजकीय वजन टिकवून ठेवले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यात एकही आमदार नसतानाही पालिका पातळीवरील ही कामगिरी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

२०१७ पूर्वी बुलढाणा जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. भाजपने उमा तायडे यांच्या रूपाने पहिला अध्यक्ष देत काँग्रेसला मोठा धक्का दिला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसने सत्तेत पुनरागमन केले; मात्र मर्यादित संख्याबळामुळे मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागले. सध्याचे पालिका निकाल पाहता, काँग्रेसला जिल्हा परिषदेसाठी सावध पण आक्रमक रणनीती आखावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पालिका निवडणुकांत घाटावर ३३ तर घाटाखाली २८ जागा जिंकत काँग्रेसने जवळपास समतोल राखला आहे. विशेष म्हणजे घाटाखाली भाजपच्या झंजावातातही ४१ टक्के जागा जिंकत काँग्रेसने जिल्ह्यात दुसरे स्थान कायम ठेवले आहे. हे निकाल काँग्रेसची मुळाशी असलेली संघटनात्मक ताकद अधोरेखित करणारे ठरतात.

Municipal Council Election : एका डॉक्टरला पसंती, वकिलांच्या कुटुंबियांना नाकारले

“सत्ताधाऱ्यांकडे अर्थकारण आणि दादागिरी असली, तरी काँग्रेसचा कार्यकर्ता मैदानात होता आणि राहील. धनशक्तीच्या विरोधात आमच्याकडे जिद्द आणि निष्ठा आहे. आगामी निवडणुकांत आमची कामगिरी आणखी सुधारेल,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.