ZP election : हॉटेल परिसरात आढळल्या सीलबंद ईव्हीएम, राष्ट्रवादी उमेदवाराचा गंभीर आरोप !

 

solapur-zp-election-mohol-evm-machine-hotel-umesh-patil-aarop : जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मोहोळमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Solapur : सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोहोळ शहराजवळील एका ढाबा आणि हॉटेल परिसरात ईव्हीएम मशीन आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

उमेश पाटील यांच्या दाव्यानुसार, मोहोळजवळील हॉटेल स्वराज्य परिसरात दोन सीलबंद ईव्हीएम मशीन आढळून आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन हॉटेल परिसरात सापडणे हे संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच उमेश पाटील यांनी संबंधित व्यक्तींना जाब विचारला आणि प्रकरण तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आत्मघाती हल्ल्याची शक्यता?

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर आणि पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून, आढळलेल्या ईव्हीएम मशीन या राखीव स्वरूपातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या मशीनचा मतदानासाठी वापर झालेला नसून त्या अद्यापही पूर्णपणे सीलबंद अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मोहोळचे तहसीलदार आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी अडवलेल्या ईव्हीएम मशीन या राखीव मशीन आहेत आणि त्यांचा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत वापर करण्यात आलेला नाही. मतदानासाठी वापरण्यात आलेल्या सर्व ईव्हीएम मशीन रात्री साडेदहा वाजेपर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या असून, स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Mohan Bhagwat : ब्राह्मण असणे ही कोणतीही विशेष पात्रता नाही!

मात्र, या स्पष्टीकरणावर समाधान न मानता उमेश पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशा घटनांमुळे लोकशाही प्रक्रियेवर आणि मतदारांच्या विश्वासावर परिणाम होतो, असे ते म्हणाले. निवडणूक काळात ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेबाबत प्रशासन अधिक सतर्क असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी 65.90 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. सांगोला तालुक्यात सर्वाधिक 70.55 टक्के मतदान झाले असून, दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वात कमी 58.39 टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सुमारे एक टक्क्याने मतदानात घट झाल्याचे चित्र आहे. मोहोळमधील ईव्हीएम प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेभोवतीचा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__