
maharashtra/zp-panchayat-samiti-election-results-12-districts-today : दुपारपर्यंत राज्याच्या ग्रामीण राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार
Mumbai: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, सकाळी विविध जिल्ह्यांतील मतमोजणी केंद्रांवर प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले असून, दुपारपर्यंत सत्तासमीकरणांचे प्राथमिक कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये विशेष चुरस पाहायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, सरासरी मतदानाची टक्केवारी ६८.८९ इतकी नोंदवली गेली आहे. वेल्हे तालुक्यात सर्वाधिक ७९.३० टक्के मतदान झाले, तर बारामतीत सर्वात कमी ५४.९० टक्के मतदानाची नोंद झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरची ही पहिलीच मोठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्याने या निकालांकडे विशेष लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील अंतर्गत लढतीचेही प्रतिबिंब या निकालांतून उमटण्याची शक्यता आहे.
Paranjape Vs Kadam : सुनील तटकरे यांच्याबाबत अभद्र टिप्पणी थांबवा, अन्यथा…
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा तब्बल ७४ टक्के मतदान झाले असून, सतेज पाटील, धनंजय महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. करवीर तालुक्यातील १२ जिल्हा परिषद जागांच्या निकालांकडे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट मोठी झेप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जिल्ह्यातील १२ मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद जागा आणि १०० पंचायत समिती जागांसाठी आज निकाल जाहीर होणार आहे. कोकणात राणे फॅक्टर पुन्हा प्रभावी ठरतो की स्थानिक प्रश्नांमुळे जनमतात बदल झाला आहे, हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
ZP election : हॉटेल परिसरात आढळल्या सीलबंद ईव्हीएम, राष्ट्रवादी उमेदवाराचा गंभीर आरोप !
या निवडणुकीत पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, सांगली, रायगड, लातूर, रत्नागिरी, धाराशिव, परभणी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांचा समावेश असून, एकूण ७३१ जिल्हा परिषद जागा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान झाले आहे. वाढलेला मतदानाचा टक्का, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आणि बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता, या निकालांचे पडसाद आगामी राज्याच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने संभाव्य तणाव लक्षात घेऊन सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, दुपारपर्यंत सत्तेचे पहिले स्पष्ट संकेत समोर येण्याची शक्यता आहे.








