Jayant Patil’s emotional letter to the people of Maharashtra : आपलेच परक्यांसोबत बसून महाराष्ट्राच्या वाटाघाटी करत असतील तर दुसरे काय होणार ?
Nagpur : महाराष्ट्रात मागील काळात ज्या काही घडामोडी घडल्या, विशेषतः बीड जिल्ह्यातील घटना. त्यामुळे समाजमन सुन्न झालं. या दरम्यान बऱ्याचशा राजकीय घडामोडीही घडल्या. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, याबाबतही विविध चर्चांना उधाण आले आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला भावनिक पत्र लिहीले आहे.
X वर पोस्ट केलेल्या पत्रामध्ये जयंत पाटील म्हणतात, ‘भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिती केली जात होती. परंतु भारत सरकारने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरून मराठी जनांत क्षोभ उसळला. यातून प्रचंड तीव्र आंदोलन आणि मोठा लढा उभा झाला. शेवटी १९६० साली स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला.
स्व. यशवंतराव चव्हाण म्हणाले त्याप्रमाणे हा सोनियाचा दिवस आपल्याला सहज मिळाला नाही, तर त्यासाठी दब्बल १०६ हुतात्मांनी बलिदान दिले. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर २१ नोव्हेंबर १९५६ साली झालेल्या मोर्चाचे देता येईल. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला. तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा विरोध करण्यासाठी कामगारांचा विशाल मोर्चा फ्लोअरा फाऊंटन येथे पोहोचला.
Jayant Patil : पूर्वनियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होता काय ?
जमावबंदी, पोलिसांचा लाठीचार्ज अशा कोणत्याही कारवाईने मोर्चा आटोक्यात आला नाही. म्हणून शेवटी मोर्चा चिरडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, मुंबई, महाराष्ट्र आणि माय मराठीसाठी तिच्या लेकरांनी आहुती दिली, तेव्हा मराठी देश स्थैर्य प्राप्त करू शकला आहे.
यंदा महाराष्ट्र ६५ वा स्थापना दिन साजरा करत आहे. गेल्या ६५ वर्षांत महाराष्ट्राने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली. पण मधल्या काळात महाराष्ट्राची प्रचंड पिछेहाट झाली. दिवसाढवळ्या महिलांच्या अब्रूवर हात टाकला जात आहे. पाण्यासाठी लोकांना जीव गमवावा लागत आहे, शेतकरी हवालदिल होऊन प्राण त्यागत आहेत, राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर हिंदीचे भूत बसले असल्याने आपल्याच घरात मराठी हाल सोसत आहे. आपलेच परक्यांसोबत बसून महाराष्ट्राच्या वाटाघाटी करत असतील तर दुसरे काय होणार ?
Jayant Patil : आपण सभागृहाची ऐसीतैसी करायला लागलो, शांत जयंत पाटील चिडले !
आता हे कुठपर्यंत सहन करायचे यासाठी मराठी माणसांनी हौतात्म्य पत्करले होत का? होत्याचं नव्हतं झालं तर येणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देणार? मुंबई, महाराष्ट्र, माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.’, असे लिहीत जयंत पाटील यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडतील का, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.