Local body election : अजित पवारांची स्वबळाची तयारी !

Indirect hints about municipal elections : महापालिका निवडणुकीबाबत अप्रत्यक्ष संकेत

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पिंपरी – चिंचवड शहराच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. या वेळी त्यांनी महापालिका निवडणुकी संदर्भात महत्त्वाचे संकेत दिले. “कोणत्याही निवडणुकीत आपण आपल्या पद्धतीने तयारी करायची असते. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि इतर पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत आहेत. आम्हीदेखील तशी तयारी करत आहोत. त्याचबरोबर महायुती अधिक मजबूत कशी होईल याबाबतही आमचा दृष्टिकोन आहे,” असे ते म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का, अशी चर्चा रंगू लागली आहे. पवार म्हणाले, “प्रत्येक पक्ष बेरजेचे राजकारण करत आहे, त्यानुसार आम्हीदेखील काम करत आहोत.”

GST 2.0 : आजपासून जीएसटी 2.0 लागू, ग्राहकांना मोठा दिलासा

जनसंवाद कार्यक्रमाचा आढावा घेत पवार म्हणाले की, त्या निमित्ताने नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या परिवार मिलन कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “रस्ते, पाणी, वीज, कचरा या समस्या समजल्या आणि काही ठिकाणी नवीन विकासकामांची गरजही अधोरेखित झाली,” असे पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव गटात गेलेले संजोग वाघेरे पुन्हा अजित पवार यांच्या गटात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संदर्भात बोलताना पवार म्हणाले, “संजोग वाघेरे यांना शिवसेनेची विचारधारा पटल्यामुळे ते तिकडे गेले; पण त्यांच्या पत्नी उषा वाघेरे आमच्या पक्षातच आहेत, कारण त्यांना माझी विचारधारा पटली आहे.”

अजित पवार यांनी पिंपरी येथील हाफकिन संस्थेलाही भेट दिली. या वेळी त्यांनी संस्थेच्या गरजांवर लक्ष वेधले. “हाफकिन ही नावाजलेली संस्था आहे, मात्र आवश्यक सोयी उपलब्ध नाहीत. संस्थेला सध्या १५० कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येईल आणि आगामी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे पवार यांनी सांगितले.

Internal conflict in BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजप फुटीच्या उंबरठ्यावर?

पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यातील अजित पवार यांच्या या विधानांमुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची अजित पवार गट स्वतंत्र रणनीती काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.