Vandalism of vehicles, stone pelting – tension in Nandurbar! : वाहनांची तोडफोड, दगडफेक – नंदूरबारमध्ये तणाव
Nandurbar : नंदूरबारमध्ये झालेल्या हाणामारीत आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ ७ आदिवासी संघटनांनी आयोजित केलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली, दगडफेक केली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह संपूर्ण नंदूरबार शहरात तणाव निर्माण झाला आहे.
नंदूरबारमध्ये झालेल्या एका हाणामारीत आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
हजारो आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. आंदोलकांच्या हातात निषेधाचे फलक होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं.
आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. अचानक वाढलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना पांगवलं.
यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Why raining : पाऊस इतका मोकाट का सुटलाय? शेतकऱ्यांची अवस्था बिकट !
या घटनेनंतर परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून नंदूरबारमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांवर पोलिस लाठीमारामुळे परिस्थिती अजून तापण्याची शक्यता आहे.
आदिवासी संघटनांचा पुढील निर्णय काय असेल, प्रशासन या प्रकरणाची चौकशी करेल का, आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
____








