BJPs demand, but determination to hold melava at Shivtirth : भाजपची मागणी, मात्र शिवतीर्थावरच मेळाव्याचा ठाम निर्धार
Mumbai : येत्या २ ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर होणाऱ्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत आता राजकीय वादळ उठले आहे. राज्यातील पुरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा रद्द करून त्या खर्चाची रक्कम पुरग्रस्तांना द्यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. मात्र, ठाकरे गटाने कुठल्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच मेळावा होणार, असा ठाम निर्णय घेतला आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले की, “मराठवाड्यातील पूरपरिस्थिती भयानक आहे. लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्ह्यांचा दौरा करत दुःख व्यक्त केले. आता वेळ आहे कृतीची. मुख्यमंत्री असताना घरात बसलात, आता प्रायश्चित्त घ्या. दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पुरग्रस्तांना द्या. अन्यथा तुमच्या भावना केवळ दिखाऊ ठरतील.”
उपाध्ये यांनी आणखी टीका करताना म्हटले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात दसरा मेळावा हा विचारांचे सोने वाटणारा कार्यक्रम होता. पण आता तिथे ‘गद्दार, माझा पक्ष चोरला’ एवढेच ऐकायला मिळते. कार्यकर्त्यांच्या खिशाला भुर्दंड घालून लाखो रुपये खर्च करून नुसता थयथयाट करण्यापेक्षा हा पैसा पुरग्रस्तांसाठी खर्च करा. रडगाणं तर ‘सामना’मधून सुरूच असतं.”
दरम्यान, ठाकरे गटाने मात्र या मागणीला फाटा देत मेळावा हा शिवाजी पार्कवरच होईल, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. मुसळधार पाऊस, मैदानावरील चिखल आणि प्रतिकूल हवामान या अडचणी असूनही ‘शिवतीर्थावरच दसरा मेळावा होणार’, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. सेना भवनात यासंदर्भात बैठक पार पडली असून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला जात असला तरी ठाकरे गट मागे हटण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे भाजपच्या मागणीला ठाकरे गट कोणते उत्तर देणार आणि दसरा मेळावा कसा पार पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.