Victory achieved by misusing the government treasury — Congress criticizes : बिहार निकालानंतर अकोल्यातील राजकारण तापले
Akola बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मिळालेल्या विजयावर अकोल्यातील राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हा विजय “पाच पांडवांचा विजय” ठरल्याचे सांगत जनतेचे आभार मानले, तर काँग्रेसने मात्र हा विजय “लोकशाहीची हत्या” असल्याचा आरोप करत निवडणुकीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
बिहारमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना मिळालेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, “बिहार जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीश कुमार, चिराग पासवान, जितेंद्र ‘जितेन’ माझी व कुशवाह यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. हा पाच पांडवांचा विजय आहे. बिहार जनतेने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”
Bihar Elections : अकोल्याचे आमदार व कार्यकर्त्यांनी प्रचार केलेल्या मतदारसंघात काँग्रेसचा विजय
बिहार निकालांच्या पार्श्वभूमीवर अकोल्याचे खासदार अनुप कुमार धोत्रे यांनीही महायुतीला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
धोत्रे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, जे.पी. नड्डा, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांतही विजयाची परंपरा कायम राहील.”
‘सरकारी तिजोरीचा गैरवापर करून विजय’ — काँग्रेसची टीका
बिहारच्या निकालावर काँग्रेसनं मात्र तीव्र प्रतिक्रिया देत NDA व भाजपवर निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांचे गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके म्हणाले की,
“बिहार निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत महिलांच्या खात्यात दहा-दहा हजार रुपये जमा केले गेले. सरकारी तिजोरीतून तब्बल ७,५०० कोटी रुपये खर्च करून निवडणूक जिंकली.”
Local Body Elections : नगरसेवक पदासाठी १६२ तर नगराध्यक्षपदासाठी १६ अर्ज दाखल
ढोके यांनी आणखी आरोप करत सांगितले की, “SIR च्या माध्यमातून जिवंत लोकांना मृत दाखवले गेले, मतदार यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. निकाल अमान्य नाहीत, पण अत्यंत संशयास्पद आणि चर्चास्पद आहेत.”
बिहारच्या निकालांचा थेट प्रभाव महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. NDAच्या विजयाला भाजपकडून उत्साही स्वागत मिळत असताना, काँग्रेसने केलेल्या आरोपांमुळे राजकीय वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








