Local Body Elections : मतदार यादीतील घोळ सात दिवसात सावरणार?

How will the mess in the voter list be fixed in seven days? : महापालिका प्रशासनापुढे मोठे आव्हान, आतापर्यंत १५३ प्रकरणांचा निपटारा

Akola महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी समोर आल्या आहेत. या अनियमिततांमुळे राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. अंतिम मुदत संपेपर्यंत मनपाकडे एकूण १,४७५ हरकती व आक्षेप प्राप्त झाले. मात्र त्यापैकी अवघ्या १५३ प्रकरणांचा निपटारा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, उर्वरित अर्ज निकाली काढण्यासाठी मनपावर मोठे दडपण आले आहे.

याद्यांमधील घोळ मोठ्या प्रमाणावर असल्याचे प्रशासनालाही मान्य करावे लागले आहे. प्रारूप यादीत अनेक मतदारांचे प्रभाग बदलल्याचे आढळून आले. बीएलओंनी नव्याने केलेल्या प्रगणक गटांच्या मांडणीदरम्यान काही प्रभागांच्या सीमारेषा चुकीच्या पद्धतीने ओलांडल्या गेल्याचे निदर्शनास आले. परिणामी, एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात दिसली; तर काही ठिकाणी मतदारांची छायाचित्रे चुकीची जोडल्या गेल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या.

Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची तात्काळ मान्यता : चंद्रपूर मोरवा विमानतळासाठी १७ कोटींची मंजूरी

या त्रुटींवर विविध राजकीय पक्षांनी लेखी आक्षेप नोंदवत प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले होते. अंतिम दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी हरकती दाखल केल्या. मात्र, १,४७५ पैकी केवळ १५३ हरकती निकाली काढण्यात आल्याने यादी दुरुस्तीचे वेळापत्रक अत्यंत कडक होणार आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी प्रत्येक प्रभागासाठी एक अशी २० विशेष पथके नियुक्त केली आहेत. प्रत्येक पथकात— एक पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि कर वसुली लिपिक यांचा समावेश असून, ते प्रत्यक्ष स्थळनिरीक्षणाद्वारे प्रकरणांचा निपटारा करतील. सर्व त्रुटी दूर करून १० डिसेंबरपर्यंत सुधारित मतदार यादी सादर करण्याच्या सूचना पथकांना देण्यात आल्या आहेत. सुधारित यादी किती अचूक आणि विश्वासार्ह ठरेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय आता ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ नावाने ओळखले जाणार

महत्त्वाचे वेळापत्रक

१० डिसेंबर : हरकतींचा निपटारा करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
१५ डिसेंबर : मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर
२२ डिसेंबर : मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या उपलब्ध