Files defamation claim of Rs 5 crore on Sulekha Kumbhare, Chandrashekhar Bawankule is aggressive : बदनामी आणि दिशाभूल केल्याचा ठपका; ४८ तासात बिनशर्त माफी मागावी
Nagpur : कामठी नगरपरिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापवणाऱ्या सुलेखा कुंभारे यांच्या आरोपांना राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट कायदेशीर उत्तर देण्याची तयारी चालवली आहे. माध्यमांमध्ये बदनामीकारक, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोप करत बावनकुळे यांनी कुंभारेंनाना नोटीस बजावली आहे. ५ कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावादेखील दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
या नोटिशीमध्ये सुलेखा कुंभारे यांनी ४८ तासांच्या आत बिनशर्त माफी मागावी, सर्व प्रसारमाध्यमांमध्ये माफीनामा प्रकाशित करावा, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. कुंभारेंच्या आरोपांवर बावनकुळेंनी पलटवार केला आहे. कामठी नगरपरिषद निवडणुकीनंतर सुलेखा कुंभारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Local Body Election : बाल्या बोरकरची दादागिरी, तरीही गुन्हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर !
भाजपने एका दलालाला उमेदवारी दिली. अजय अग्रवाल यांनी मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करवले. भाजपने लोकशाहीची हत्या केली आणि पार्थ पवारांच्या कथित जमीन व्यवहारात स्वतः बावनकुळे सहभागी आहेत, असे आरोप करत त्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे सावट टाकण्याचा प्रयत्न कुंभारेंनी केला होता. यासोबतच बावनकुळे यांना संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे धक्कादायक विधान करून कुंभारेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.
आरोप खोटे, हेतुपुरस्सर बदनामी..
कायदेशीर नोटिशीत बावनकुळेंनी स्पष्ट केले आहे की, सुलेखा कुंभारे यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे असत्य, आधारहीन आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणारे आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार,
कुंभारे यांनी जाणीवपूर्वक माध्यमांचा गैरवापर केला, जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तसेच माझ्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनाला धक्का पोहोचविण्यासाठी खोटे कथन केले. या आरोपांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला व त्यांच्या संवैधानिक पदाला धक्का लागल्यानेच त्यांनी कायदेशीर पावले उचलली.
४८ तासांची डेडलाइन, अन्यथा..
नोटिशीत स्पष्ट नमूद आहे की, सुलेखा कुंभारे यांनी सार्वजनिकरीत्या बिनशर्त माफी मागावी, सर्व प्रमुख प्रसारमाध्यमांत माफीनामा प्रसिद्ध करावा, ४८ तासांत प्रतिसाद न दिल्यास ५ कोटींच्या अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला जाईल. कामठी निवडणुकीपासून पेटलेला वाद आता थेट कायदेशीर टप्प्यावर पोहोचला आहे. पुढील ४८ तासांत सुलेखा कुंभारे माफी मागतात की संघर्षाची दिशा न्यायालयाकडे वळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








