Dead leopard found in the Sarolapir area : नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा
Motala मोताळा वनपरिक्षेत्रातील रोहिणखेड बिट हद्दीत येणाऱ्या सारोळापीर शिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याची घटना ५ डिसेंबर रोजी उघडकीस आली. अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की कोणत्यातरी घातपातामुळे, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोस्टमार्टम अहवालानंतरच वास्तव समोर येणार आहे. वनविभागाने बिबट्याचा मृत्यू अंदाजे १२ ते २० तासांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
अलीकडील काळात पुन्हई, काबरखेड, गुळभेली, टाकळी, मुर्ती, वडगाव, वाघजाळ, परडा, रोहिणखेड आदी भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून पशुधनावर हल्ल्यांच्या अनेक घटना नोंदल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरलेली आहे.
Teacher’s Constituency : जिल्ह्यातील 8055 अर्ज पात्र; दावे व हरकतींसाठी 18 डिसेंबरपर्यंत मुदत
शुक्रवारी सकाळी सारोळापीर शिवार गट क्रमांक ८५ मध्ये केशरबाई शांताराम गवळी यांच्या मका शेतात बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सहाय्यक वनसंरक्षक अश्वीनी आपेट, मोताळा प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे, वनपाल नारखेडे व वनरक्षक सिरसाठ यांनी पाहणी करून प्राथमिक नोंदी केल्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक कोकाटे यांनी बिबट्याचे पोस्टमार्टम केले असून अहवाल नागपूर फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक सुरेश गवस व सहाय्यक वनसंरक्षक अश्वीनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल काळे पुढील तपास करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की संशयास्पद याविषयी अंतिम निष्कर्ष काढला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.








